विधान परिषद पोटनिवडणूक : नागपुरातून भाजपचे राजीव पोतदार विजयी
नागपूर, 22 जून (हिं.स.) : नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ. राजीव पोतदार यांनी दणदणीत विजय मिळवत काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे झालेल्या म
डॉ. राजीव पोतदार, भाजपचे विजयी उमेदवार (संग्रहित फोटो)


नागपूर, 22 जून (हिं.स.) : नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ. राजीव पोतदार यांनी दणदणीत विजय मिळवत काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे झालेल्या मतमोजणीत भाजपने स्पष्ट आघाडी घेत विजयावर शिक्कामोर्तब केले.

या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अतुल लोंढे यांना केवळ १३० मते मिळाली, तर भाजपचे विजयी उमेदवार डॉ. राजीव पोतदार यांनी तब्बल ६८२ मते मिळवत निर्णायक विजय नोंदवला. एकूण ८३४ मतदारांपैकी ११ मते अवैध ठरली. मतदान १८ जून रोजी पार पडले होते.निवडणुकीपूर्वी डॉ. पोतदार यांनी ५४५ पेक्षा अधिक मतदारांचे समर्थन असल्याचा दावा केला होता, जो निकालातून मोठ्या प्रमाणात योग्य ठरल्याचे दिसून आले. या निकालानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद आणि रणनीतीबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.या निवडणुकीत बुटीबोरी नगर परिषदेतील भाजप आणि ‘परिवर्तन पॅनल’मधील मते निर्णायक ठरल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे या पॅनलला पूर्वी काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पाठिंबा होता. मात्र अलीकडील राजकीय घडामोडींनंतर या मतांमध्ये भाजपकडे झुकाव झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निवडणुकीपूर्वी बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न केले होते. मात्र काँग्रेसने निवडणूक लढवण्याचा निर्णय कायम ठेवत भाजपला थेट आव्हान दिले. काँग्रेसकडून अतुल लोंढे आणि दिनेश ढोले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने पक्षांतर्गत समन्वयाबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.या मतदारसंघात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपचे संख्याबळ अधिक असल्याने सुरुवातीपासूनच पक्ष मजबूत स्थितीत मानला जात होता. तरीही काँग्रेसने ही निवडणूक प्रतिष्ठेची करून आपली उपस्थिती दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र अंतिम निकालात भाजपने संघटनात्मक ताकद आणि स्थानिक नेटवर्कचा प्रभावी वापर करत विजय मिळवला. या विजयानंतर सिव्हिल लाईन्स येथील स्वागत लॉनमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. दुसरीकडे काँग्रेस गोटात निराशेचे वातावरण असून निकालानंतर पक्षाच्या अंतर्गत रणनीतीवर नव्याने विचार सुरू झाल्याचे चित्र आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande