अमरावती विधान परिषद निवडणूक : भाजपचे प्रवीण पोटे यांची विजयी ‘हॅटट्रिक’
अमरावती, 22 जून (हिं.स.) : विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे यांनी विक्रमी ३९० मते मिळवत पहिल्याच फेरीत दणदणीत विजय संपादन केला. या विजयासह त्यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवून ‘हॅटट्
प्रवीण पोटे भाजप नेते


अमरावती, 22 जून (हिं.स.) : विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे यांनी विक्रमी ३९० मते मिळवत पहिल्याच फेरीत दणदणीत विजय संपादन केला. या विजयासह त्यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवून ‘हॅटट्रिक’ साधली आहे.

या निवडणुकीत एकूण ४२७ मतदानांपैकी ४२१ मते वैध ठरली, तर ६ मते अवैध घोषित करण्यात आली. विजयासाठी आवश्यक असलेला २११ मतांचा कोटा प्रवीण पोटे यांनी सहज पार करत वैध मतदानाच्या ९२.६३ टक्के मते आपल्या खात्यात जमा केली.वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नीलेश विश्वकर्मा यांना ३१ मते मिळाली, तर काँग्रेसचे उमेदवार हर्षजीत देशमुख यांना एकही मत मिळाले नाही. त्यामुळे काँग्रेसची या निवडणुकीतील कामगिरी अत्यंत निराशाजनक ठरली.

काँग्रेसने स्थानिक नेत्यांऐवजी नागपूरचे उद्योजक हर्षजीत देशमुख यांना उमेदवारी दिल्यानंतर पक्षात नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. प्रचाराच्या महत्त्वाच्या टप्प्यात देशमुख यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल व्हावे लागले. त्यांच्या एंजिओग्राफीनंतर प्रचार जवळपास ठप्प झाल्याचे चित्र होते.दरम्यान, काँग्रेसच्या काही स्थानिक नेत्यांनी देशमुख यांच्यावर भाजपशी ‘मॅनेज’ झाल्याचा आरोप करत पक्षाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अखेरीस अनेक नेत्यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली.

अमरावती स्थानिक स्वराज्य मतदारसंघात काँग्रेसचे ११९, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) चे १८ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे १३ सदस्य मिळून महाविकास आघाडीकडे सुमारे १५० मतांचे संख्याबळ होते. मात्र, निवडणुकीदरम्यान बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे ही मते मोठ्या प्रमाणात फुटल्याचे निकालातून स्पष्ट झाले.काँग्रेसने मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला असला तरी अनेक सदस्यांनी पक्षादेश धुडकावून मतदान केले.

यातील बहुतांश मते भाजपच्या पारड्यात गेल्याचे निकालातून दिसून आले.

शिवसेना शिंदे गटाचे बंडखोर उमेदवार विप्लव बाजोरिया रिंगणातून बाहेर पडल्यानंतर आणि विरोधकांमधील गोंधळामुळे भाजपची बाजू अधिक भक्कम झाली. परिणामी, प्रवीण पोटे यांनी विक्रमी मताधिक्यासह विजय संपादित केला.

-----------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande