
पुणे, 22 जून (हिं.स.)। भारत निवडणूक आयोगामार्फत महाराष्ट्रात राबविण्यात येणाऱ्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेबाबत माहिती देण्यासाठी 206 पिंपरी (अनुसूचित जाती) विधानसभा मतदारसंघाच्या वतीने विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीत विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेचे कामकाज, वेळापत्रक आणि अंमलबजावणी प्रक्रियेची सविस्तर माहिती मतदार नोंदणी अधिकारी अर्चना यादव यांनी दिली.त्यांनी सांगितले की, 30 जून 2026 पासून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ ) यांच्यामार्फत एन्युमरेशन फॉर्म वाटप सुरू होणार आहे. तसेच 5 ऑगस्ट 2026 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.यानंतर प्राप्त हरकती आणि सूचनांवर सुनावणी घेऊन अंतिम मतदार यादी 7 ऑक्टोबर 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक राजकीय पक्षाने भागनिहाय बीएलए-2 नियुक्त करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि सर्वसमावेशक करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन अर्चना यादव यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु