
नाशिक, 22 जून (हिं.स.)। शहरातील प्रसिद्ध मे. बाफना ज्वेलर्स प्रा. लि. या सराफी शोरूमच्या संचालकांनी संगनमत करून टी. जे. एस. बी. बँकेला ३८ कोटी रुपयांचा गंडा घालून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, मुख्य संशयित नीलेश सुभाष बाफना यास अटक करण्यात आली आहे.
याबाबत टी. जे. एस. बी. बँकेचे व्यवस्थापक सुहास विजय दंडवते यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले, की बाफना ज्वेलर्सच्या संचालकांनी संगनमत करून ऑक्णोबर १९९८ पासून बँकेच्या शरणपूर रोड शाखेतून टप्प्याटप्प्याने कॅश क्रेडिट कर्ज घेतले होते, जे ४४ कोटी रुपयांपर्यंत झाले. मार्च २०२५ पासून कर्जदारांनी बँकेचे व्याज भरण्यास कसूर केली. त्यामुळे त्यांचे खाते जून २०२५ मध्ये एन. पी. ए. घोषित करण्यात आले. बँकेने कायदेशीर वसुलीची कारवाई सुरू केली असता संचालकांनी बँकेला दुकानातील स्टॉकची तपासणी करू दिली नाही आणि स्वतःच्या सहीने दुकानात ५९ बार्फणा ज्वेलर्स प्रा.लि. कोटी ७ लाख २४ हजार ८४४ रुपयांचा माल असल्याचे खोटे स्टेटमेंट बँकेला सादर केले, तसेच दुकानात सोने, चांदी आणि हिऱ्यांचा साठा असल्याचे खोटे व बनावट स्टेटमेंट तयार करून बँकेकडून कोट्यवधींचे कर्ज घेण्यात आले होते.
बँकेच्या अर्जावर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी कोर्ट कमिशनर म्हणून अॅड. अमोल वावीकर यांची नियुक्ती केली होती. दि. ३ जून २०२६ रोजी कोर्ट कमिशनर, पंच, मूल्यांकनकार आणि पोलीस बंदोबस्तासह शरणपूर रोडवरील सुयोजित संकुलामध्ये बाफना ज्वेलर्सचे दुकान जप्त करण्यासाठी पोहोचले. संचालकांनी सहकार्य न केल्याने अखेर दुकानाचे शटर तोडण्यात आले. दुकानात प्रवेश करून जेव्हा शोकेस व तिजोऱ्यांची तपासणी केली, तेव्हा ५९ कोटी रुपयांचा साठा सांगणाऱ्या दुकानात सोन्याचा किंवा हिऱ्याचा एकही दागिना नव्हता. तेथे केवळ चांदीच्या वस्तू आणि दागिने आढळले, ज्यांचे मूल्यांकन केवळ २५ लाख १९ हजार २५० रुपये इतकेच निघाले. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे हस्तांतरित करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष नरूटे करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV