
अमरावती, 22 जून (हिं.स.) : मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील बोरधा गावातील ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईवर मात करण्यासाठी स्वतःच पुढाकार घेत लोकवर्गणीतून बोअरवेल खोदण्याचा आदर्श उपक्रम राबविला आहे. प्रशासनाकडून वारंवार मागणी करूनही दखल घेतली जात नसल्याने गावातील 110 कुटुंबांनी प्रत्येकी अडीच हजार रुपये जमा करून तब्बल 2 लाख 75 हजार रुपयांची निधी उभारणी केली.
सुमारे 550 लोकसंख्या असलेल्या बोरधा गावात अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या होती. राहू गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या या गावातील नागरिकांना पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत होती. अखेर गावातील काही तरुणांनी एकत्र येऊन या समस्येवर कायमस्वरूपी उपाय शोधण्याचा निर्णय घेतला.
कोणतीही औपचारिक बैठक न घेता चार-पाच युवकांनी रात्री चर्चा करून बोअरवेल खोदण्याचा पर्याय निश्चित केला. त्यानंतर एका खाजगी यंत्रणेकडून खर्चाचा अंदाज घेऊन ही माहिती गावातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचविण्यात आली. ग्रामस्थांनी या उपक्रमावर विश्वास दाखवत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि अवघ्या आठ दिवसांत आवश्यक निधी जमा करण्यात आला.
विशेष म्हणजे काही कुटुंबांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही त्यांनी या कामासाठी पुढाकार घेतला. काहींनी सावकारांकडून उसनवारी केली, काहींनी दागिने गहाण ठेवले, तर काहींनी घरातील बकरी विकून आवश्यक रक्कम जमा केली.
बोअरवेलसाठी योग्य जागा निश्चित करण्यासाठी मध्यप्रदेशातील एका कंपनीची मदत घेण्यात आली. गावातील विद्यमान हँडपंपांमध्ये पाणी उपलब्ध नसल्याने नव्या ठिकाणी खोदकाम करण्यात आले. तब्बल साडेसहाशे फूट खोल बोअर केल्यानंतर पाण्याचा स्त्रोत सापडला. मात्र, अतिरिक्त शंभर फूट केसिंग पाईप बसविण्यासाठी अधिक खर्च आवश्यक असल्याने गावकऱ्यांनी उपलब्ध निधीतच काम पूर्ण करण्याचा निर्णय घेतला.
यामुळे पाण्याचा दाब अपेक्षेपेक्षा कमी असला तरी गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. पूर्वी पिण्याचे पाणी आणण्यासाठी एक ते दीड किलोमीटर अंतर पार करावे लागत होते. आता गावातच पाण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या उपक्रमात मुंगा काळमा धिकार, सोमा रोना कासदेकर, चंदू नंदराम धिकार, डाबली बापूराव धिकार, राजेश काळमा कासदेकर, झुले जिरगा धिकार, प्रतिराम सोनाजी चिमोटे, नंदराम बिसराम धिकार, रेखा शंकर कासदेकर, प्रमिला काळमा कासदेकर, टुमली बालू धिकार, शांती लाभा कासदेकर यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी मोलाचे योगदान दिले.
---------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी