

- प्रति शेअर किंमत पट्टा 107 ते 113 रुपये
नवी दिल्ली, 22 जून (हिं.स.)। ओडिशास्थित सरकारी आयटी सोल्यूशन्स पुरवणारी सीएसएम टेक्नोलॉजीज लिमिटेड कंपनीचा प्रारंभिक समभाग विक्री प्रस्ताव (आयपीओ) बुधवार, 24 जून 2026 रोजी खुला होणार आहे. या आयपीओसाठी गुंतवणूकदारांना 29 जूनपर्यंत बोली लावता येणार आहे. कंपनीने प्रति शेअर 107 ते 113 रुपये असा किंमत पट्टा (प्राइस बँड) निश्चित केला आहे. अँकर गुंतवणूकदारांसाठी बोली प्रक्रिया 23 जून रोजी खुली राहणार आहे.
सीएसएम टेक्नोलॉजीज लिमिटेडच्या या इश्यूमधील समभागांचे दर्शनी मूल्य (फेस व्हॅल्यू) 10 रुपये आहे. गुंतवणूकदारांना किमान 132 इक्विटी शेअर्ससाठी बोली लावावी लागेल. त्यानंतर 132 शेअर्सच्या पटीत अतिरिक्त अर्ज करता येणार आहेत. हा आयपीओ पूर्णपणे फ्रेश इश्यू स्वरूपातील असून, कंपनी 1.29 कोटी नवीन इक्विटी शेअर्स जारी करणार आहे. या इश्यूमध्ये ऑफर फॉर सेल (ओएफएस) चा कोणताही भाग समाविष्ट नाही. त्यामुळे आयपीओद्वारे उभारली जाणारी संपूर्ण रक्कम कंपनीकडेच जाणार असून तिचा वापर व्यवसाय विस्तारासाठी केला जाणार आहे.
कंपनीच्या माहितीनुसार, आयपीओतून उभारण्यात येणाऱ्या निधीपैकी 53 कोटी रुपये कार्यकारी भांडवलाच्या (वर्किंग कॅपिटल) गरजा पूर्ण करण्यासाठी वापरले जातील. तसेच 25.88 कोटी रुपये कर्जफेडीसाठी खर्च करण्यात येतील. याशिवाय काही निधी संभाव्य अधिग्रहणे आणि इतर कॉर्पोरेट गरजांसाठी राखून ठेवण्यात येणार आहे.
या आयपीओमधील समभागांचे वाटप (अलॉटमेंट) 30 जून रोजी होण्याची शक्यता आहे. कंपनीचे समभाग 2 जुलै 2026 रोजी बीएसई आणि एनएसईवर सूचीबद्ध (लिस्ट) होण्याची शक्यता आहे.
सीएसएम टेक्नोलॉजीज लिमिटेड ही कंपनी 1998 मध्ये स्थापन झाली असून सरकारी आणि खासगी क्षेत्रांसाठी नाविन्यपूर्ण प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या निवडक आयटी सोल्यूशन्स कंपन्यांपैकी एक आहे. कंपनी सरकारी तंत्रज्ञान उपाययोजना (गव्हर्नमेंट टेक सोल्यूशन्स) आणि डिजिटल परिवर्तन (डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन) सेवा पुरविण्यात विशेष प्रावीण्य राखते.
ही कंपनी खाणकाम (मायनिंग) आणि संबंधित सेवा, सरकारी व सार्वजनिक सेवा तसेच पर्यटन क्षेत्रासाठी विविध तंत्रज्ञानाधारित उपाय उपलब्ध करून देते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule