
मियामी (अमेरिका), 22 जून (हिं.स.) फिफा विश्वचषकात पदार्पण करणाऱ्या काबो वर्देने मियामी स्टेडियमवर झालेल्या रोमांचक सामन्यात दोनदा विजेतेपद पटकावणाऱ्या उरुग्वेला २-२ अशा बरोबरीत रोखले. काबो वर्देने २१ व्या मिनिटाला इतिहास घडवला, जेव्हा केविन पिनाने देशाचा फिफा विश्वचषकातील पहिला गोल नोंदवला. या मिडफिल्डरने लांब अंतरावरून घेतलेल्या 'कर्ल्ड' फ्री-किकद्वारे उरुग्वेचा गोलरक्षक फर्नांडो मुस्लेरा याला चकवले आणि स्पर्धेत नव्याने आलेल्या या संघाला अनपेक्षित आघाडी मिळवून दिली.
उरुग्वेने याला जोरदार प्रत्युत्तर दिले आणि हळूहळू सामन्यावरील ताबा मिळवला. त्यांच्या आक्रमक खेळाचा फायदा पहिल्या सत्राच्या उत्तरार्धात झाला. ४४ व्या मिनिटाला मॅक्सिमिलियानो अराउजोने गोल करून सामना बरोबरीत आणला उरुग्वेला २-१ अशी आघाडी मिळवून दिली.
दुसऱ्या सत्रात बराच काळ दक्षिण अमेरिकन संघाचे वर्चस्व दिसून आले. पण बचावातील एका चुकीमुळे काबो वर्देला सामन्यात पुनरागमन करण्याची संधी मिळाली. ६१ व्या मिनिटाला, मॅथियास ऑलिव्हेराने आपल्याच बचाव फळीत एक कमकुवत पास दिला, जो बदली फुटबॉलपटू हेलिओ वारेलाने अडवला. या फॉरवर्ड फुटबॉलपटूने गोलरक्षक मुस्लेराला चकवले आणि रिकाम्या जाळीत चेंडू मारून सामना बरोबरीत आणला.
सामन्याच्या अंतिम टप्प्यात उरुग्वेने विजयासाठी जोरदार प्रयत्न केले आणि आक्रमकता वाढवण्यासाठी डार्विन नुनेझला मैदानात उतरवले. या स्ट्रायकरने 'स्टॉपेज टाइम'मध्ये एक धोकादायक संधी निर्माण केली होती. पण फेडरिको वाल्व्हरडेला त्याच्या 'लो-क्रॉस'वर चेंडूवर अचूक ताबा मिळवता आला नाही. त्यानंतर काही क्षणांतच, ९३ व्या मिनिटाला, गोलच्या दिशेने आगेकूच केल्यानंतर ऑगस्टिन कॅनोबिओला विजय निश्चित करण्याची सुवर्णसंधी मिळाली. मात्र, या फॉरवर्ड फुटबॉलपटूचा फटका 'क्रॉसबार'च्या वरून गेल्याने काबो वर्देला हा ऐतिहासिक गुण राखता आला.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे