उदगीरमध्ये 26 जून रोजी कॅन्सर रोग निदान तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन
लातूर, 22 जून (हिं.स.) रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रल, विवेकानंद कॅन्सर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल लातूर व साई हॉस्पिटल उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 26 जून रोजी कॅन्सर तपासणी व मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. याच दिवशी विविध आजाराची तपास
उदगीरमध्ये 26 जून रोजी कॅन्सर रोग निदान तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन


लातूर, 22 जून (हिं.स.) रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रल, विवेकानंद कॅन्सर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल लातूर व साई हॉस्पिटल उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 26 जून रोजी कॅन्सर तपासणी व मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. याच दिवशी विविध आजाराची तपासणी व शस्त्रक्रिया शिबीराचेही आयोजन करण्यात आले असल्याची माहिती रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलचे अध्यक्ष प्रशांत मांगुळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महिलांमधील वाढणारा स्तनाचा व गर्भाशयाचा कॅन्सर आणि पुरुषामधील तोंडाचा कॅन्सर यांचे लवकर निदान व्हावे यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तोंड पूर्ण उघडण्यास त्रास होणे, शरीरावर किंवा स्तनात न दुखणारी गाठ येणे, वेगाने भूख मंदावणे आणि वजन कमी होणे, अंगावरून पांढरे /लाल पाणी जाणे, आवाजात बदल होणे, गिळताना त्रास होणे अशी अनेक लक्षणं आढळून आलेल्या रुग्णाची याठिकाणी तपासणी होऊन मार्गदर्शन केले जाणार आहे.

या शिबिरात लातूर येथील कॅन्सर तज्ज्ञ डॉ. ब्रिजमोहन झंवर, वैद्यकीय संचालक डॉ. अरुणा देवधर, ऍड. अनिल अंधोरीकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

याच शिबिरात विविध आजाराची तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात अपेंडिक्स, हायड्रोसील, हर्निया भगंदर, मूळव्याध, फिशर, विविध प्रकारच्या गाठी, पित्ताशय काढण्याची शस्त्रक्रिया आदी आजाराची तपासणी व त्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. या शिबिरात रुग्णाची तपासणी व शस्त्रक्रियेसाठी कोणताही खर्च लागणार नाही. भुलतज्ञ डॉक्टरांची फीस व औषधी रुग्णांनी स्वखर्चाने घ्यायची आहेत. या शिबिरात डॉ. माधव चंबुले यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉक्टरांची टीम रुग्णाची तपासणी करणार आहे.

उदगीर येथील शेल्हाळ रोडवरील साई हॉस्पिटल येथे शुक्रवार दि. 26 जून रोजी सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत हे शिबीर चालू राहणार आहे. या शिबिराचा गरजूनी लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी प्रशांत मांगुळकर यांनी केले. या पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष मोतीलाल डोईजोडे, सचिव विक्रम हलकीकर, प्रोजेक्ट चेअरमन विशाल जैन आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande