
-उत्पादकता वाढीसाठी शेतामध्ये विविध प्रात्यक्षिके
अमरावती, 22 जून (हिं.स.) | केंद्र शासनाच्या कापूस उत्पादकता अभियान (कपास क्रांती) अंतर्गत सावळापूर पूर्णा येथे कापूस पिकासाठी विविध प्रात्यक्षिके राबविण्याच्या अभियानाची सुरुवात करण्यात आली. अचलपूर कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात शेतकऱ्यांना योजनेची सविस्तर माहिती देण्यात आली.
कृषी सहाय्यक अधिकारी भागवत सोमटकर यांनी सांगितले की, सन २०२६-२७ ते २०३०-३१ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या अभियानाचा उद्देश कापूस उत्पादन व उत्पादकता वाढविणे हा आहे. आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित लागवड पद्धती आणि एकात्मिक पीक व्यवस्थापनाचा अवलंब करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. उपकृषी अधिकारी अतुल हुड यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे आणि उत्पादन खर्च कमी करणे हे अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सांगितले. पात्र शेतकरी, शेतकरी गट, एफपीओ व सहकारी संस्थांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
प्रगतीशील शेतकरी मिलिंद गोदे यांनी गावातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करत कापुस क्रांतीमुळे उत्पादनवाढीसह आर्थिक प्रगतीलाही चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमास परिसरातील मोठ्या संख्येने कापूस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी