
लातूर, 22 जून (हिं.स.) : पशुवैद्यकीय महाविद्यालय उदगीर येथे सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजश्री गंदगे यांच्या मार्गदर्शनाखाली गो-आधारित नैसर्गिक शेती या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. मानवी उत्तम आरोग्यासाठी आणि जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी गो-आधारित नैसर्गिक शेती महत्वाची आहे असे प्रतिपादन उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. राजश्री गंदगे यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मुख्य मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र शासन कृषिभूषण पुरस्कार प्राप्त प्रगतिशील शेतकरी श्याम सोनटक्के हे उपस्थित होते. यावेळी मंचावर वरिष्ठ प्राध्यापक डॉ. गणेश गादेगावकर आणि प्रशिक्षण समन्वयक डॉ. प्रफुल्लकुमार पाटील उपस्थित होते. प्रमुख पाहुणे श्याम सोनटक्के यांनी नैसर्गिक शेतीचे महत्व, पद्धती तसेच विपणन व्यवस्थापन याबाबत प्रशिक्षणार्थीना सखोल मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणात डॉ. विलास डोंगरे आणि डॉ. प्रफुल्लकुमार पाटील यांनी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणासाठी एकूण २४ प्रशिक्षणार्थीनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis