अमरावती : रस्त्यावरील भेगांमुळे अपघातांचा धोका वाढला
अमरावती, 22 जून (हिं.स.) : मोर्शी सिमेंट रस्त्यावर अनेक ठिकाणी पडलेल्या मोठ्या भेगांमुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. धूळ व वाहतूक कोंडीबाबत नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. महाराष्ट्र -मध्यप्रदेशला जोडणारा रस्ता काही वर्षांप
रस्त्यावरील भेगांमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात


अमरावती, 22 जून (हिं.स.) : मोर्शी सिमेंट रस्त्यावर अनेक ठिकाणी पडलेल्या मोठ्या भेगांमुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. धूळ व वाहतूक कोंडीबाबत नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. महाराष्ट्र -मध्यप्रदेशला जोडणारा रस्ता काही वर्षांपूर्वीच नांदगाव पेठ ते मोर्शी हा सिमेंट रस्ता बांधण्यात आला असताना आता रस्त्याला भेगा पडल्याने रस्त्याच्या दर्जाबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी या भेगा सहजपणे दिसत नसल्याने दुचाकी चालकांचे चाक भेगांमध्ये अडकून वाहनावरील नियंत्रण सुटण्याच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे किरकोळ तसेच गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असून प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

दरम्यान, काही ठिकाणी रस्ता खोदून दुरुस्तीचे काम सुरू असले तरी भेगा, अर्धवट दुरुस्ती आणि सुरू असलेल्या कामांमुळे वाहतूक विस्कळीत होत आहे. परिणामी वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याच मार्गावर अप्पर वर्धा धरणातून अमरावती शहरासाठी पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन टाकण्याचे कामही वेगाने सुरू आहे. या कामासाठी वापरण्यात येणारे पोकलेन, जेसीबी आणि इतर अवजड यंत्रांमुळे अनेक वेळा वाहतुकीची कोंडी होत असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून येतात. स्थानिक नागरिकांच्या मते, काही ठिकाणी पोकलेन थेट सिमेंट रस्त्यावरून चालविण्यात येत असल्याने रस्त्याच्या मजबुतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच कामादरम्यान रस्त्यावर साचलेली माती व उडणाऱ्या धुळीमुळे वाहनचालकांच्या डोळ्यात धूळ जाऊन प्रवास धोकादायक बनला आहे. नागरिकांनी संबंधित विभागाने रस्त्यावरील भेगांची तातडीने दुरुस्ती करावी, पाइपलाइन कामादरम्यान वाहतूक नियोजन प्रभावीपणे करावे तसेच धूळ नियंत्रणासाठी नियमित पाणी फवारणीची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande