रत्नागिरी : शैक्षणिक संधीमुळे माणूस समृद्ध होतो : डॉ. उदय निरगुडकर
रत्नागिरी, 22 जून (हिं.स.) । देश नैसर्गिक साधनसंपत्तीमुळे नव्हे, तर त्या देशातील माणसांमुळे संपन्न होतो आणि शैक्षणिक संधीमुळे माणूस समृद्ध होतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार, लेखक डॉ. उदय निरगुडकर यांनी केले. चिपळूण येथील नवकोकण एज्युकेशन सोसायट
चिपळूणच्या नवकोकण एज्युकेशन सोसायटीच्या वर्धापन दिन समारंभात डॉ उदय निरगुडकर


रत्नागिरी, 22 जून (हिं.स.) । देश नैसर्गिक साधनसंपत्तीमुळे नव्हे, तर त्या देशातील माणसांमुळे संपन्न होतो आणि शैक्षणिक संधीमुळे माणूस समृद्ध होतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार, लेखक डॉ. उदय निरगुडकर यांनी केले.

चिपळूण येथील नवकोकण एज्युकेशन सोसायटीच्या एकसष्टाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष श्रीधर भिडे, उपाध्यक्ष प्रकाश केशव जोशी व राजू भागवत, विश्वस्त सुनील भागवत, चेअरमन मंगेश तांबे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्राचार्य डॉ. माधव बापट यांनी प्रास्ताविकात महाविद्यालयाच्या शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचा आढावा घेतला. नुकताच महाविद्यालयाला स्वायत्ततेचा दर्जा प्राप्त झाल्याचा अभिमान व्यक्त करत त्यांनी संस्थेच्या प्रगतीचा गौरव केला.संस्थेचे अध्यक्ष श्रीधर भिडे यांनी संस्थेची उभारणी करणाऱ्या शिक्षणप्रेमींचे स्मरण करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. भविष्यातही विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रमुख पाहुणे डॉ. उदय निरगुडकर यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात ज्ञानाची ओढ असणे आवश्यक असून, कोकण ही बौद्धिकदृष्ट्या समृद्ध भूमी असल्याचे त्यांनी नमूद केले. निकोप शिक्षण व्यवस्थेमुळेच देशाची प्रगती शक्य असून शिक्षकांनी शिल्पकाराप्रमाणे विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य करावे, असे मत त्यांनी व्यक्त केले. शिक्षण हे केवळ व्यवसाय नसून एक व्रत असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

यावेळी जागतिक योगासन स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या डीबीजे महाविद्यालयाच्या कु. तन्वी रेडीज हिचा विशेष सन्मान करण्यात आला. बारावीच्या विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेतील विशेष प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.कार्यक्रमाला मान्यवरांबरोबरच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विनायक बांद्रे यांनी केले, तर नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे सचिव अतुल चितळे यांनी आभार मानले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande