
रायगड, 22 जून (हिं.स.) कृषी विभागामार्फत राज्यात राबविण्यात येणाऱ्या कृषी यांत्रिकीकरण योजनांतील पात्र लाभार्थ्यांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने आवश्यक निधी उपलब्ध करून दिला असून अनुदान वितरणाची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती कृषी अभियांत्रिकी संचालनालयाचे कृषी संचालक अंकुश माने यांनी दिली.
महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान (SMAM), राष्ट्रीय कृषी विकास योजना तसेच राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना राबविण्यात येतात. या योजनांतर्गत ट्रॅक्टर, पॉवर टिलर, स्वयंचलित यंत्रे, ट्रॅक्टरचलित अवजारे, पिक संरक्षण अवजारे, प्राथमिक प्रक्रिया यंत्रे आणि भाडेतत्त्वावरील सेवा सुविधा केंद्रांसाठी अनुदान दिले जाते.
सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात या तीनही योजनांसाठी एकूण २६३.७२ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून प्रक्रियेत असलेल्या पात्र लाभार्थ्यांना अनुदान अदा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यंत्रे व अवजारांसाठी सर्वसाधारणपणे एकूण किंमतीच्या ४० ते ५० टक्के किंवा केंद्र शासनाने निश्चित केलेल्या कमाल मर्यादेनुसार अनुदान मंजूर केले जाते.
सन २०२५-२६ मध्ये महाडीबीटी पोर्टलवर प्राप्त अर्जांपैकी ३६ लाखांहून अधिक अर्जांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी २ लाख ३९ हजार ३३७ लाभार्थ्यांना पूर्वसंमती देण्यात आली असून २ लाख ३२ हजार ७९७ लाभार्थ्यांनी यंत्रे खरेदी करून आवश्यक कागदपत्रे अपलोड केली आहेत.
मागील आर्थिक वर्षात या योजनांअंतर्गत एकूण १,०५६.३१ कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले असून पात्र लाभार्थ्यांना वेळेत लाभ मिळावा यासाठी विभागामार्फत कार्यवाही सुरू असल्याचे अंकुश माने यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)