
सिंगल फेज पुरवठा बंद, तक्रारींकडे दुर्लक्ष
अमरावती, 22 जून (हिं.स.)।अंजनगावबारी व परिसरातील शेतकऱ्यांना महावितरणच्या अयोग्य व निष्काळजी सेवेमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सिंगल फेज वीजपुरवठा वारंवार खंडित होत असून, उपकेंद्रातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित असतानाही समस्यांचे निराकरण केले जात नसल्याची गंभीर तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, वीजपुरवठा बंद झाल्यानंतर संबंधित ऑपरेटर व अधिकाऱ्यांना वारंवार फोन करूनही प्रतिसाद मिळत नाही. अनेक वेळा कॉल उचलले जात नसून, काही प्रकरणांमध्ये शेतकऱ्यांना उद्धट वागणूक, शिवीगाळ आणि धमक्या दिल्या जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. सध्या पावसाळा सुरू झाला असला तरी पाऊस येत नसल्याने भाजीपाला व अन्य पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. मात्र विजेच्या अनियमित पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असून पिके धोक्यात आली आहेत. वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. याबाबत तातडीने दखल घेऊन संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून योग्य कारवाई करावी, अन्यथा अमरावती विभागीय मुख्य कार्यालयाकडे लेखी तक्रार तसेच आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी