
अमरावती, 22 जून (हिं.स.) वरूड- नागपूर मार्गावर धावणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 'निम-आराम' बसेस सध्या प्रवाशांसाठी मनस्ताप ठरत आहेत. निम-आरामच्या नावाखाली प्रवाशांची उघड आर्थिक लूट केली जात असून, वेळ आणि पैशांचा अपव्यय होत असल्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, अवघ्या दोन तासांच्या प्रवासासाठी तब्बल साडेतीन तास लागत असून सुविधांच्या नावाने मात्र शून्य कारभार आहे.
या मार्गावर १० ते १२ वर्षे जुन्या आणि अत्यंत भंगार अवस्थेतील 'हिरकणी' प्रकारच्या बसेस धावत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या बसेसच्या दोन्ही बाजूंना खतांच्या मोठ्या जाहिराती लावण्यात आल्या आहेत. या जाहिरातींमुळे बसवर असलेले 'हिरकणी' किंवा 'निम-आराम' हे नाव पूर्णपणे झाकले गेले आहे. परिणामी, प्रवासी याला नेहमीची साधी बस समजून आत चढतात. मात्र, बस सुरू झाल्यावर वाहक जेव्हा थेट २४९ रुपयांचे तिकीट फाडतो, तेव्हा प्रवाशांना धक्का बसतो आणि वादाला सुरुवात होते.
दुप्पट भाडे, पण सोयी-सुविधा 'भंगार'
साध्या बसचे भाडे १२५ रुपये असताना केवळ १ ते २ थांबे कमी आहेत, या नावाखाली प्रवाशांकडून २४९ रुपये म्हणजे जवळपास दुप्पट भाडे वसूल केले जाते. मात्र, सुविधांचा विचार केला तर या बसेसची अवस्था अत्यंत दयनीय आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी