रत्नागिरी : माखजनमधील बूट विक्रेत्याची ऑनलाइन ३८ हजारांची फसवणूक
रत्नागिरी, 22 जून (हिं.स.) । माखजन (ता. संगमेश्वर) येथील एका फूटवेअर विक्रेत्याची ऑनलाइन फसवणूक करून अज्ञात भामट्याने ३८ हजार रुपये लंपास केले. या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळाल
रत्नागिरी : माखजनमधील बूट विक्रेत्याची ऑनलाइन ३८ हजारांची फसवणूक


रत्नागिरी, 22 जून (हिं.स.) । माखजन (ता. संगमेश्वर) येथील एका फूटवेअर विक्रेत्याची ऑनलाइन फसवणूक करून अज्ञात भामट्याने ३८ हजार रुपये लंपास केले. या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संतोष यशवंत सावर्डेकर (वय ४४, रा. रोहिदासवाडी, माखजन, ता. संगमेश्वर) यांचे माखजन बाजारपेठेत फूटवेअरचे दुकान आहे. २५ मे २०२६ रोजी सायंकाळी ६ ते रात्री ९ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने ऑनलाइन माध्यमातून त्यांच्या बँक खात्यांमध्ये अनधिकृत व्यवहार केले.

भामट्याने प्रथम संतोष सावर्डेकर व त्यांच्या पत्नीच्या नावावरील बँक ऑफ महाराष्ट्र, माखजन शाखेतील संयुक्त खात्यातून २ हजार रुपये तसेच सावर्डेकर यांच्या जनता सहकारी बँकेच्या खात्यातील १२ हजार रुपये दुसऱ्या खात्यात वर्ग केले. त्यानंतर त्यांच्या संमतीशिवाय विविध ऑनलाइन व्यवहारांद्वारे एकूण ३८ हजार रुपयांची रक्कम काढून घेतली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

ही बाब सावर्डेकर यांच्या आधी लक्षात आली नाही. बँकेचे पासबुक पाहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फसवणुकीमागील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

दरम्यान, वाढत्या सायबर फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी बँक खात्यांची माहिती, ओटीपी, यूपीआय पिन किंवा इतर गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande