मारुती सुझुकी गुजरातमधील पाच आयटीआयमध्ये मॅन्युफॅक्चरिंग लॅबची करणार स्थापना
नवी दिल्ली, 22 जून (हिं.स.)। मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड (एमएसआयएल) गुजरातमधील पाच औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) प्रगत उत्पादन प्रयोगशाळा (ॲडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंग लॅब्स) स्थापन करणार आहे. मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने सोमवारी जारी
GJ Maruti Suzuki set up advanced manufacturing lab


नवी दिल्ली, 22 जून (हिं.स.)। मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड (एमएसआयएल) गुजरातमधील पाच औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) प्रगत उत्पादन प्रयोगशाळा (ॲडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंग लॅब्स) स्थापन करणार आहे.

मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने सोमवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यासाठी कंपनीने गुजरात सरकारच्या रोजगार व प्रशिक्षण संचालनालयासोबत (डीईटी) सामंजस्य करार (एमओयू) केला आहे. या प्रगत उत्पादन प्रयोगशाळा पालनपूर, भावनगर, सुरेंद्रनगर, गोधरा आणि दाहोद येथील आयटीआयमध्ये उभारण्यात येणार आहेत.

प्रवासी कार निर्माती कंपनी एमएसआयएलचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी (कॉर्पोरेट व्यवहार) राहुल भारती म्हणाले, “प्रगत उत्पादन प्रयोगशाळांच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षणासह आधुनिक उपकरणांच्या वापराचे शिक्षण देणार आहोत. यामुळे विकसित होत असलेल्या वाहन उद्योगाच्या गरजांनुसार सहजपणे काम करू शकणारे कुशल व्यावसायिक तयार होतील.”

मारुती सुझुकी इंडिया सध्या देशभरातील उत्पादन क्षेत्राशी संबंधित ३१ आयटीआयंसोबत कार्यरत आहे. कंपनीने देशभरात १८ प्रगत उत्पादन प्रयोगशाळा स्थापन केल्या आहेत. गुजरातमध्ये आणखी पाच नवीन प्रयोगशाळा सुरू झाल्यानंतर गुजरात, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, पंजाब आणि चंदीगड या सात राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये कंपनीच्या एकूण २३ प्रगत उत्पादन प्रयोगशाळा कार्यरत असतील.

मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड ही देशातील सर्वात मोठी प्रवासी वाहन उत्पादक कंपनी असून, देशांतर्गत प्रवासी वाहन बाजारपेठेत तिचा सुमारे ४० टक्के हिस्सा आहे. जपानी कंपनी सुझुकी मोटर कॉर्पोरेशनची ही उपकंपनी असून तिचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड परवडणाऱ्या, विश्वासार्ह आणि इंधन-कार्यक्षम वाहनांच्या निर्मितीसाठी ओळखली जाते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande