
डोंबिवली, 22 जून (हिं.स.)। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त बोडस सभागृह येथे राष्ट्र आराधन या संघगीतांच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी बोडस मंगल कार्यालय येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला डोंबिवलीकरांसह इतर शहरातून आलेल्या संघ स्वयंसेवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भारत विकास परिषद, क्रीडा भारती आणि संस्कार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमामध्ये डोंबिवलीतील संघ स्वयंसेवकांनी विविध संघगीतांचे सादरीकरण केले. या कार्यक्रमात निवेदक, गायक आणि वादक हे सर्व स्वयंसेवकच होते. विशेष म्हणजे बाल स्वयंसेवकांनी सादर केलेल्या बासरी वादनाने उपस्थितांची मने जिंकली.
संस्कार भारतीचे रांगोळी कलाकार उमेश पांचाळ यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व आद्य सरसंघचालक परमपूजनीय डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचे आकर्षक आणि देखणे पोर्ट्रेट कार्यक्रम चालू असताना काढले.
आयुर्वेदाचार्य वैद्य विनय वेलणकर यांनी डोंबिवलीतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचा इतिहास आणि प्रवास उपस्थितांसमोर उलगडून सांगितला. डोंबिवलीतून प्रचारक म्हणून देशभर कार्यासाठी गेलेल्या तसेच विविध ठिकाणांहून डोंबिवलीत आलेल्या प्रचारकांचा सन्मान करण्यात आला. तसेच राष्ट्रसेविका समिति, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, संस्कार भारती आदी संघ परिवारातील विविध क्षेत्रांसाठी प्रचारक म्हणून कार्य केलेल्या कार्यकर्त्यांचाही गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक रवी अय्यर तसेच क्षेत्र प्रचार प्रमुख प्रमोद बापट उपस्थित होते. स्थानिक आमदार तथा भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही उपस्थितांशी संवाद साधला. संघ शताब्दी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या राष्ट्र आराधन कार्यक्रमाने उपस्थितांमध्ये राष्ट्रभक्ती, संघटनशक्ती आणि सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ केली.
-----------
हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi