एचडीएफसी लाईफचा 'रेडी फॉर लाईफ' अहवाल जाहीर
* आर्थिक सज्जतेबाबत नोकरदार महिलांचा मानसिक दृष्टीकोन-वास्तविक तयारीतील तफावत ठळकपणे उघड
एचडीएफसी लाईफ

* आर्थिक सज्जतेबाबत नोकरदार महिलांचा मानसिक दृष्टीकोन-वास्तविक तयारीतील तफावत ठळकपणे उघड

मुंबई, 22 जून (हिं.स.) - भारतातील नोकरदार महिलांची भूमिका आता केवळ घराच्या उत्पन्नात हातभार लावण्यापुरती मर्यादित राहिलेली नसून त्या आता घरातील आर्थिक निर्णय घेणाऱ्या प्रमुख व्यक्ती म्हणून प्रकाशझोतात येत चालल्या आहेत. तथापि, आपल्या करिअरच्या महत्त्वाकांक्षा आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या या दोघांचा ताळमेळ राखण्याच्या कसरतीत अनेक नोकरदार महिला आर्थिक नियोजनाच्या बाबतीत पुरेशा तयार नसल्याचे दिसते.

एचडीएफसी लाईफने प्रसिध्द केलेल्या 'रेडी फॉर लाईफ रिपोर्ट २०२५' या अहवालामधून नोकरदार महिला कौटुंबिक उत्पन्नामध्ये अधिकाधिक महत्त्वाचा वाटा उचलत असल्याची बाब ठळकपणे समोर आली आहे. परंतु जेव्हा त्यांच्या आर्थिक सज्जतेचा विचार केला जातो, तेव्हा त्यांची वास्तविक तयारी पुरेशी नसते, या वास्तवावरही हा अहवाल प्रकाशझोत टाकतो.

रेडी फॉर लाईफ' या अहवालातून असे दिसून येते की, नोकरदार महिलांना आर्थिक सज्जतेबाबत मानसिक दृष्टीकोनासाठी ८४ गुण मिळतात, परंतु प्रत्यक्षातील आर्थिक तयारीचा त्यांचा हा स्कोअर केवळ ५८ इतकाच आहे. यातून आर्थिक नियोजनाबाबतची त्यांची मानसिक दृष्टीकोन आणि वास्तविक तयारी यामध्ये २६ गुणांची मोठी दरी असल्याचे यातून दिसून येते.

महिलांचे वित्तीय निर्णय हे अतिशय मोठ्या प्रमाणात आजूबाजूच्या परिस्थितीवर तसेच सामाजिक शिफारशींवर आधारलेले असतात. ३५ टक्के पुरुषांच्या तुलनेत ४० टक्के महिलांमध्ये बचतीच्या उद्दीष्टामागे मूलांचे शिक्षण हे प्रमुख कारण असल्याचे दिसून आले आहे, तर ३७ टक्के महिला स्वतःच्या मालकीच्या घरालाही प्राधान्य देत असून त्यांचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत अधिक असून ३३ टक्के पुरूषांत बचतीसाठी हे कारण असल्याचे दिसून आले आहे. यावरून हे सिद्ध होते की, कुटुंबाच्या दीर्घकालीन महत्त्वाकांक्षा आणि स्वप्नांना आकार देण्यात महिला अत्यंत अग्रणी भूमिका बजावत आहेत.

आर्थिक संरक्षण आणि निवृत्तीचे नियोजन ही अशी दोन मुख्य क्षेत्रे आहेत, ज्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. आर्थिक संरक्षणाविषयी लोकांमध्ये जागरूकता असली, तरी जेव्हा मुदत विमा (टर्म इन्शुरन्स) खरेदी करण्याचा विचार येतो, तेव्हा त्या प्रमाणात प्रत्यक्ष लोक विमाच घेत नाहीत. तसेच, निवृत्तीनंतरच्या नियोजनाबाबतही जागरूकता असूनही, केवळ ४३ टक्के लोकांनाच असे वाटते की, ते निवृत्तीनंतर इतरांवर आर्थिकदृष्ट्या अवलंबून न राहता ते आपले जीवन सहज जगू शकतील.

एचडीएफसी लाईफचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि चीफ बिझनेस ऑफिसर विनीत अरोरा म्हणाले, “कुटुंबासाठी नोकरदार महिलांचे योगदान हे केवळ घराच्या उत्पन्नापुरते मर्यादित नसून त्याहून खूप अधिक आहे. एक नोकरदार महिला कुटुंबाला आर्थिक सुरक्षितता देण्यात त्याचबरोबर स्वतःचे हक्काचे घर असणे आणि मुलांचे शिक्षण यांसारख्या जीवनातील महत्त्वाच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते. परंतु या उद्दीष्टासाठी ती धडपड करत असताना तिने स्वतःच्या दीर्घकालीन आर्थिक सुरक्षिततेसाठी आणि निवृत्तीनंतरच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आधीपासूनच नियोजन करणे आवश्यक आहे. जीवन विमा योजना जीवनाच्या अशाच वेगवेगळ्या टप्प्यांवरील गरजा पूर्ण करण्यासाठी तयार केलेल्या असतात. समाजातील वाढत्या जागरूकतेमुळे त्याचबरोबर योग्य माहितीच्या आधारे आर्थिक सुरक्षा साधनांची निवड केल्यास, अधिकाधिक नोकरदार महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि कोणत्याही स्थितीला तोंड देण्यास तयार होतील, असा आम्हाला ठाम विश्वास आहे.”

'रेडी फॉर लाईफ इंडेक्स २०२५' हा एचडीएफसी लाईफचा स्वतःचा संशोधन उपक्रम आहे. हे संशोधन 'इप्सॉस इंडिया' या एका स्वतंत्र मार्केट रिसर्च कंपनीने केले आहे. महानगरे, टियर २ आणि टियर ३ शहरांमधील २५ ते ५५ वयोगटातील १८३६ नोकरदार पुरुष आणि महिलांच्या प्रत्यक्ष मुलाखतींवर आधारित हे संशोधन आहे. हे संशोधन भारतीयांची लाईफ रेडीनेस म्हणजेच आयुष्याच्या पूर्वतयारीचे मूल्यमापन प्रामुख्याने आर्थिक नियोजन, आपत्कालीन परिस्थितीची तयारी, आरोग्य आणि कल्याण आणि निवृत्तीचे नियोजन या चार मुख्य स्तंभांआधारे करते.

लोकांची केवळ समज, धारणा आणि त्यांची प्रत्यक्षातील तयारी यामधील तफावत ठळकपणे समोर आणणे, हा या निर्देशांकाचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे लोकांना अल्पकालीन बचतीकडून एका शिस्तबद्ध, दीर्घकालीन आर्थिक नियोजनाकडे वळण्यास प्रोत्साहन मिळेल.

कुटुंबातील आर्थिक निर्णय घेणाऱ्या प्रमुख व्यक्ती म्हणून महिला पुढे येत आहेत आणि या बदलाची दखल घेत आर्थिकदृष्ट्या सक्षम व सुरक्षित कुटुंब साकारण्यासाठी महिलांना आर्थिक संरक्षणावर आधारित वित्तीय नियोजनाची संधी देणे गरजेचे आहे. तसेच त्यांच्यासाठी अधिकाधिक वित्तीय योजना उपलब्ध करुन देणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande