नेरळ नळ कनेक्शन प्रकरणात दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
रायगड, 22 जून (हिं.स.)। नेरळ येथील चिचआळी-चिंताई परिसरातील पुष्कर अपार्टमेंटला देण्यात आलेल्या वादग्रस्त नळकनेक्शन प्रकरणात अखेर कारवाई करण्यात आली असून पाणीपुरवठा विभागातील विजय भिसे आणि रवींद्र कालेकर या दोन कर्मचाऱ्यांना प्रत्येकी दहा दिवसांसाठी
Illegal water connection exposed; Vijay Bhise and Ravindra Kalekar suspended.


रायगड, 22 जून (हिं.स.)। नेरळ येथील चिचआळी-चिंताई परिसरातील पुष्कर अपार्टमेंटला देण्यात आलेल्या वादग्रस्त नळकनेक्शन प्रकरणात अखेर कारवाई करण्यात आली असून पाणीपुरवठा विभागातील विजय भिसे आणि रवींद्र कालेकर या दोन कर्मचाऱ्यांना प्रत्येकी दहा दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे.

संबंधित अपार्टमेंटला ग्रामपंचायतीची अधिकृत वर्क ऑर्डर तसेच आवश्यक पावती नसताना नळकनेक्शन देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा झाल्यानंतर हा प्रकार चर्चेत आला. त्यानंतर संबंधित नळकनेक्शन काढून टाकण्यात आल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.

दरम्यान, कर्जत पंचायत समिती सदस्य भगवान चंचे यांनी या प्रकरणावर सुरुवातीपासूनच आवाज उठवत संबंधित कर्मचाऱ्यांना धारेवर धरले होते. नियमबाह्य पद्धतीने कामकाज झाल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती.

या संदर्भात ग्रामपंचायतीकडे विचारणा केली असता, संबंधित नळकनेक्शन देण्यासाठी ग्रामपंचायतीने कोणतीही वर्क ऑर्डर दिलेली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांनी परस्पर निर्णय घेत नियमबाह्य पद्धतीने कनेक्शन दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

प्रशासक सुजित धनगर आणि ग्रामपंचायत प्रशासनातील अरुण कारले यांच्या आदेशानुसार विजय भिसे आणि रवींद्र कालेकर या दोन्ही कर्मचाऱ्यांना दहा दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, या नियमबाह्य नळकनेक्शन प्रकरणात आणखी कोणाची जबाबदारी निश्चित होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या पुढील चौकशीत आणखी कोणती माहिती समोर येते, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

दरम्यान, पंचायत समिती सदस्य भगवान चंचे यांनी नागरिकांच्या प्रश्नांसाठी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली असून, दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यामुळे या प्रकरणातील पुढील घडामोडींवर नागरिकांचे बारकाईने लक्ष लागून राहिले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande