
छत्रपती संभाजीनगर, 22 जून (हिं.स.) : फुलंब्री तालुक्यातील महालकिन्होळा येथे अघोषित भारनियमनाचा मोठा फटका एका शेतकऱ्याला बसला असून, दीड एकरातील अद्रक लागवड उगवण्यापूर्वीच नष्ट झाली आहे.
महालकिन्होळा शिवारातील गट क्रमांक 290 मध्ये शेतकरी श्याम कैलास तुपे यांनी 22 दिवसांपूर्वी मोठ्या अपेक्षेने अद्रक लागवड केली होती. बियाणे, मशागत, मजुरी आणि ठिबक सिंचनासाठी त्यांनी मोठी आर्थिक गुंतवणूक केली होती.
मात्र, सतत वाढलेले तापमान आणि त्यातच महावितरणकडून होणाऱ्या अघोषित भारनियमनामुळे वेळेवर सिंचन शक्य झाले नाही. विहिरीत पाणी उपलब्ध असूनही वीजपुरवठा नसल्याने पिकाला पाणी देता आले नाही. परिणामी, जमिनीत ओलावा कमी होऊन अद्रक बियाणे उगवण्यापूर्वीच जळून गेले.
या घटनेमुळे शेतकऱ्याचे सुमारे 1 लाख 80 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. संपूर्ण गुंतवणूक व मेहनत वाया गेल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी भारनियमन आणि अनियमित वीजपुरवठ्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
--------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis