ऑपरेशन शोध-४ मध्ये १४ अपहृत मुलींसह १०५ हरवलेले महिला-पुरुष शोधले
लातूर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी लातूर, २२ जून (हिं.स.) : महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या निर्देशानुसार ८ जून ते २२ जून २०२६ या कालावधीत राज्यभर राबविण्यात आलेल्या ऑपरेशन शोध-४ मोहिमेत लातूर पोलिसांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
पोलीस कारवाई


लातूर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

लातूर, २२ जून (हिं.स.) : महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या निर्देशानुसार ८ जून ते २२ जून २०२६ या कालावधीत राज्यभर राबविण्यात आलेल्या ऑपरेशन शोध-४ मोहिमेत लातूर पोलिसांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांनी समन्वयाने काम करत अपहरण झालेल्या मुली तसेच हरवलेल्या महिला व पुरुषांचा शोध घेण्यात मोठे यश मिळविले.

मोहिमेचे महत्त्व लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना नियमित सूचना देत मोहिमेचा सातत्याने आढावा घेतला. त्यांच्या नेतृत्वाखाली लातूर जिल्ह्यात अपहरण झालेल्या एकूण १४ मुलींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले असून त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, ही मोहीम केवळ अपहरण झालेल्या मुलांच्या शोधापुरती मर्यादित न ठेवता हरवलेल्या महिला व पुरुषांचाही शोध घेण्यावर भर देण्यात आला. त्यानुसार मोहिमेदरम्यान ७३ हरवलेल्या महिलांचा आणि ३२ हरवलेल्या पुरुषांचा शोध घेण्यात पोलिसांना यश मिळाले.

याशिवाय, मोहिमेची व्याप्ती अधिक व्यापक करत जिल्ह्यात विविध ठिकाणी भटकणारी, मजुरी करत असलेली किंवा असुरक्षित परिस्थितीत आढळून येणाऱ्या अल्पवयीन मुलांकडेही विशेष लक्ष देण्यात आले. विटभट्ट्यांवर, हॉटेलमध्ये काम करताना अथवा सार्वजनिक ठिकाणी भटकताना आढळलेल्या मुलांची ओळख पटवून त्यांना त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचविण्याचे निर्देश देण्यात आले होते.

या अनुषंगाने शिवाजीनगर पोलीस ठाण्याने अभिलेखावर नोंद नसलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा शोध घेऊन त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे.

ऑपरेशन शोध-४ अंतर्गत लातूर पोलिसांनी अपहृत व हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी केलेले अथक प्रयत्न, संवेदनशील दृष्टीकोन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे प्रभावी मार्गदर्शन यामुळे अनेक कुटुंबांना आपल्या हरवलेल्या आप्तांचा पुन्हा सहवास लाभला आहे. त्यामुळे लातूर पोलिसांची ही कामगिरी केवळ आकडेवारीपुरती मर्यादित न राहता अनेक कुटुंबांच्या जीवनात आनंद परत आणणारी ठरली आहे.

------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande