परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीचे सईद खान विजयी
परभणी, 22 जून (हिं.स.) : परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार सईद खान यांनी पहिल्या पसंतीची सर्वाधिक 242 मते मिळवत विजय संपादन केला. एकूण 465 मतांपैकी खान यांनी निर्णायक आघाडी घेत प्रतिस्पर्ध्यांवर मात केल
स्थानिक स्वराज्यसंस्था मतदारसंघाच्या निवडणूकीत महायुतीचे सईद खान विजयी : खान यांना 242 मते


परभणी, 22 जून (हिं.स.) : परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार सईद खान यांनी पहिल्या पसंतीची सर्वाधिक 242 मते मिळवत विजय संपादन केला. एकूण 465 मतांपैकी खान यांनी निर्णायक आघाडी घेत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण आणि निवडणूक निरीक्षक रुचेश जयवंशी यांच्या उपस्थितीत मतमोजणीला सुरुवात झाली. यावेळी निवडणूक रिंगणातील उमेदवारांच्या पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी करण्यात आली.

मतमोजणीअंती महायुतीचे उमेदवार सईद खान यांना 242 मते मिळाली. महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. विवेक नावंदर यांना 159 मते मिळून ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले, तर अपक्ष उमेदवार सुशिलभैय्या देशमुख यांना 56 मते मिळाली आणि ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

एकूण मतदानापैकी 8 मते बाद ठरली. पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये स्पष्ट बहुमत मिळाल्याने सईद खान यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.

या निकालामुळे परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीची पकड अधिक मजबूत झाल्याचे मानले जात असून, कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande