
-अन्न व औषधी प्रशासन विभागाची धास्ती
अमरावती, 22 जून (हिं.स.)। सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारताच राज्यभर धडक कारवाईचा सपाटा लावला आहे. परिणामी गुटखा, पानमसाल्यांची सर्रास विक्री करणाऱ्या वरुड येथील बहुतांश पानटपऱ्या बंद आहेत आणि ज्या उघड्या आहेत, त्यांनी विक्री बंद केली आहे.
वरुड तालुक्यात व प्रत्येक गावात गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू यासारखे प्रतिबंधित साहित्य मोठ्या प्रमाणात विकले जातात. तालुक्यातील पानटपरी चालकांचा एकप्रकारे हाच मुख्य व्यवसाय आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात एफडीएचे अधिकारी सर्वत्र तपासणी करीत आहेत. आपल्याही पानटपऱ्यांची चौकशी होईल, या धास्तीने सर्वच घाबरले आहेत. वरुड शहरातील आठवडी बाजार परिसर, पेट्रोल पंप चौक, महात्मा गांधी चौक, महात्मा फुले चौक, संत्रा लिलाव मंडी, राजुरा नाका, पांढूर्णा चौक, इंदिरा चौक, सावता चौक, मुलताई चौक, जायंटस चौक, बसस्थानक चौक तसेच इतर परिसरातील बहुतांश पानटपऱ्या आणि काही भागांतील लहान व्यावसायिकांची दुकाने बंद असल्याचे दिसून आले.
विशेष म्हणजे, तालुक्यातील अनेक गावांमधील पानटपरी चालकांनीही संभाव्य कारवाईच्या भीतीने आपले व्यवसाय तात्पुरते बंद ठेवणे पसंत केले आहे. एफडीएच्या वाढत्या हालचालींमुळे अन्नपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता, परवानग्या आणि नियमांचे पालन, याकडे प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केल्याची चर्चा व्यापारी वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे नियमांचे पालन न करणारे व्यावसायिक सद्य:स्थितीत सावध भूमिका घेत आहेत. अनेक ठिकाणी स्वच्छता, परवाने आणि अन्नसुरक्षा नियमांची पडताळणी सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी