
अवैध मतांमुळे राजकीय चर्चांना उधाण
अमरावती, 22 जून (हिं.स.) : अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार प्रवीण पोटे-पाटील यांनी 390 मते मिळवत सलग तिसऱ्यांदा विजयाची हॅट्ट्रिक साधली. मात्र, निवडणुकीच्या निकालानंतर आता अवैध ठरलेल्या मतांच्या गणिताने अमरावतीच्या राजकीय वर्तुळात नवा सस्पेन्स निर्माण केला आहे.
या निवडणुकीत एकूण 6 मते अवैध ठरली असून, त्यापैकी तब्बल 5 मतपत्रिका पूर्णपणे कोऱ्या आढळल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, मतदानाच्या आदल्या दिवशी काँग्रेसने आपल्या सदस्यांना तटस्थ राहण्याचा व्हीप जारी केला होता. अशा परिस्थितीत कोऱ्या मतपत्रिका नेमक्या कुणी टाकल्या, याबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
अमरावती महानगरपालिकेतील राजकीय समीकरणांचा विचार करता, काँग्रेसच्या 18 सदस्यांना मतदानात सहभागी न होण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, पक्षाचा आदेश धाब्यावर बसवत 18 पैकी 6 सदस्यांनी मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदविल्याचे सांगितले जात आहे. यानंतर मतमोजणीत 5 कोऱ्या मतपत्रिका आढळल्याने संशयाची सुई या सदस्यांकडे वळली आहे.
राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की, पक्षाचा व्हीप पाळायचा की मतदान करायचे, या द्विधा मनःस्थितीत असलेल्या काही सदस्यांनी मतदान केंद्रात जाऊन कोऱ्याच मतपत्रिका मतपेटीत टाकल्या असाव्यात. गुप्त मतदान पद्धतीमुळे या मतपत्रिका नेमक्या कुणाच्या आहेत, हे अधिकृतरीत्या स्पष्ट होणे कठीण मानले जात आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षजित देशमुख यांना एकही मत मिळाले नसल्याने आणि काँग्रेसमधील बंडखोर सदस्यांच्या भूमिकेमुळे या अवैध मतांमागे पक्षातील अंतर्गत नाराजी किंवा रणनीती असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
या कोऱ्या मतपत्रिकांमुळे भाजप उमेदवाराच्या विजयावर कोणताही परिणाम झाला नसला, तरी महाविकास आघाडी आणि काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. याशिवाय एका मतपत्रिकेवर केवळ सही करण्यात आल्याने ते मतही अवैध ठरले असल्याची माहिती आहे.
------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी