साई जन्मस्थान मंदिराचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. के. कुलकर्णी यांना सन्मानपूर्वक निरोप
परभणी, 22 जून (हिं.स.)। पाथरी येथील श्री साईबाबा जन्मस्थान मंदिर येथे सन 2017 पासून मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले एन. के. कुलकर्णी यांना साई स्मारक समिती विश्वस्त मंडळाच्या वतीने सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला. त्यांच्या नऊ वर्षांच्
साई जन्मस्थान मंदिराचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. के. कुलकर्णी यांना सन्मानपूर्वक निरोप : नऊ वर्षांच्या सेवाकाळात मंदिर प्रशासनात अनेक सकारात्मक बदल; विश्वस्त मंडळाकडून शाल-श्रीफळ देऊन गौरव


परभणी, 22 जून (हिं.स.)। पाथरी येथील श्री साईबाबा जन्मस्थान मंदिर येथे सन 2017 पासून मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले एन. के. कुलकर्णी यांना साई स्मारक समिती विश्वस्त मंडळाच्या वतीने सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला. त्यांच्या नऊ वर्षांच्या कार्यकाळात मंदिराच्या प्रशासनिक आणि व्यवस्थापकीय कामकाजात महत्त्वपूर्ण सुधारणा घडवून आणल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.

शिर्डी संस्थानमध्ये अधीक्षक (सामान्य प्रशासन) पदावरून निवृत्त झाल्यानंतर तत्कालीन अध्यक्ष कै. सिताराम सोमा धानू यांच्या आग्रहास्तव कुलकर्णी यांनी 2017 मध्ये पाथरी येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला होता. साईबाबांच्या कर्मभूमीची सेवा झाली, आता जन्मभूमीची सेवा करायची आहे, या भावनेतून त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली होती. शिर्डी संस्थानमधील प्रदीर्घ अनुभवाचा लाभ पाथरी येथील साई जन्मस्थान मंदिराला झाला. त्यांच्या कार्यकाळात मंदिरातील प्रशासन, आस्थापना, सेवेकर्यांचे कामकाज आणि विविध व्यवस्थापन प्रक्रियांमध्ये शिस्तबद्धता व कार्यक्षमता वाढविण्यात आली. तसेच देशभरातील साईभक्तांशी असलेल्या संपर्काचा उपयोग करून साईबाबांच्या जन्मस्थानाची माहिती व्यापक स्तरावर पोहोचविण्याचे कार्य त्यांनी केले.

अलीकडेच एन्जिओप्लास्टी आणि डोळ्याची शस्त्रक्रिया झाल्याने वयोमान व प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. समितीने त्यांचा राजीनामा आदरपूर्वक स्वीकारला. मूळ शिर्डीचे रहिवासी असलेल्या कुलकर्णी यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना, वडिलांकडून पाथरी हेच साईबाबांचे जन्मस्थान असल्याची माहिती मिळाल्याने येथे सेवा करण्याची संधी मिळणे हे आपले भाग्य असल्याचे सांगितले.

निरोप समारंभात त्यांच्या पत्नी छाया कुलकर्णी व पुत्र साईप्रसाद यांचाही सत्कार करण्यात आला. समितीचे अध्यक्ष सुभाष दळी यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. छाया कुलकर्णी यांनीही शिर्डी संस्थानमधील नैवेद्य व्यवस्थापनाचा अनुभव पाथरी येथे मंदिर अधीक्षक म्हणून प्रभावीपणे वापरल्याचा उल्लेख यावेळी करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande