
नांदेड, 22 जून (हिं.स.) : जून महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू असूनही अपेक्षित पाऊस न झाल्याने आणि जिल्ह्यातील अनेक भागांत उष्णतेची तीव्रता कायम असल्याने नांदेड जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांचे वेळापत्रक सकाळच्या सत्रात घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जारी केले आहेत.
आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 मधील तरतुदीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळा व महाविद्यालयांचे वर्ग सकाळी 8 ते दुपारी 12.30 या वेळेत भरविण्यात येणार आहेत.
यामध्ये मराठी, इंग्रजी, उर्दू माध्यमांसह राज्य मंडळ, सीबीएसई आणि इतर शैक्षणिक मंडळांच्या सर्व शाळांचा समावेश आहे. शिक्षण विभागाने सर्व शाळा व्यवस्थापनांना या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
जिल्ह्यातील वाढत्या उष्णतेचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये, तसेच सुरक्षित वातावरणात शिक्षण सुरू राहावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
शिक्षण विभागाच्या माहितीनुसार, पुढील आदेश मिळेपर्यंत इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचे सर्व वर्ग सकाळी 8 ते 12.30 या वेळेतच घेण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील सर्व शाळा व्यवस्थापनांनी या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis