
पुणे, 22 जून (हिं.स.)। पुणे जिल्ह्यातील आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय (पुणे) कार्यक्षेत्रातील वारंवार अपघात होणाऱ्या धोकादायक ठिकाणांची (ब्लॅक स्पॉट्स) संयुक्त पाहणी करण्याचे आदेश पुणे आरटीओ अधिकाऱ्यांनी वायुवेग पथकांना दिले आहेत. या अंतर्गत नवले पूल, चांदणी चौक, कात्रज यांसह एकूण ३१ ब्लॅक स्पॉट्सचा सविस्तर पंचनामा केला जाणार आहे.
जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशांनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. या कामासाठी विशेष पाच रस्ता सुरक्षा पथकांची नियुक्ती करण्यात आली असून, संबंधित पोलिस विभाग, रस्ता निर्मिती यंत्रणा तसेच लाइफ फाउंडेशन आणि ब्लूमबर्ग या सामाजिक संस्थांचे प्रतिनिधीही या संयुक्त पाहणीमध्ये सहभागी होणार आहेत.या पथकांकडून सर्व ब्लॅक स्पॉट्सची प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर अहवाल तयार करण्यात येणार आहे. हा अहवाल २५ जूनपर्यंत आरटीओ कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानंतर २९ जून २०२६ रोजी होणाऱ्या जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत हा अहवाल पुणे जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडला जाणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु