
परभणी, 22 जून (हिं.स.)।
परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्यसंस्था मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार सईद खान यांनी सोमवार 22 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकार्यांच्या कक्षापासून शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांसह सख्ख्या भावास तेथून हटविल्याबद्दल जिल्हाधिकार्यांच्या समक्ष पोलिस अधिकार्यांवर रोष व्यक्त करीत खड्या आवाजात सूनावले. स्थानिक स्वराज्यसंस्था मतदारसंघातील निवडणूकीचा निकाल जाहीर झाल्या पाठोपाठ महायुतीचे उमेदवार सईद खान यांना जिल्हा निवडणूक तथा जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी विजयाचे प्रमाणपत्र सुपूर्त केले. त्यावेळीच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम व सईद खान यांचे बंधू व अन्य काहींना पोलिस अधिकार्यांनी जिल्हाधिकार्यांच्या त्या कक्षेपासून बाजूला हटवले. त्यावर नवनिर्वाचित आमदार खान यांनी आक्षेप घेतला. अन् तेथील पोलिस अधिकार्यास जिल्हाधिकारी चव्हाण यांच्या समक्ष “जिल्हाप्रमुखांना ढकलू नका, तो आमदारकीचा उमेदवार आहे, मी निवडून आलो म्हणून द्वेष आला का? कोणाची सुपारी घेतली का? धक्के मारु नका, ही पध्दत नाही, माझ्या भावाला धक्के मारता का? हे बरोबर नाही, आपण अतिरेक करता आहात, तुमच्यात माणुसकी आहे का?” वगैरे शब्दात सूनावले. यावेळी जिल्हाधिकार्यांनी खान यांना शांत रहा अशी सूचना केली. तेव्हा जिल्हाप्रमुख व आपल्या भावास धक्के मारण्याचा प्रकार चुकीचा आहे, असे खान यांनी जिल्हाधिकार्यांच्या निदर्शनास आणून दिले. दीड-दोन मिनीटांचा तो प्रकार तेथील माध्यमांच्या प्रतिनिधींनी कॅमेर्यात टिपला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis