
अमरावती, 22 जून (हिं.स.)।
अमरावती विधान परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांनी काँग्रेस आणि एमआयएमवर टीकेची झोड उठवली. पराभव स्वीकारत त्यांनी आपल्या पाठीशी उभे राहिलेल्या ३१ मतदारांचे आभार मानले, मात्र काँग्रेसने शेवटपर्यंत स्पष्ट भूमिका घेत वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा दिला नसल्याने निवडणुकीच्या निकालावर परिणाम झाल्याचा दावा त्यांनी केला.निवडणुकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विश्वकर्मा म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीने सातत्याने बहुजन, वंचित आणि दुर्लक्षित घटकांचे प्रश्न मांडले आहेत. मात्र विरोधी मतांचे एकत्रीकरण होणे अपेक्षित असताना काँग्रेसकडून अपेक्षित सहकार्य मिळाले नाही. त्यामुळे भाजपविरोधी मतांचे विभाजन झाले आणि त्याचा थेट परिणाम निकालावर दिसून आला.विश्वकर्मा यांनी एमआयएमवरही गंभीर आरोप केले. भाजपविरोधी भूमिका घेणाऱ्या एमआयएमच्या काही नगरसेवकांनी प्रत्यक्ष मतदानावेळी भाजपच्या उमेदवाराला मत दिल्याचा आरोप त्यांनी केला. विचारधारेच्या नावावर राजकारण करणाऱ्या पक्षांनी आपल्या भूमिकेशी प्रामाणिक राहणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी अशा कृतीमुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचे नमूद केले.“निवडणूक ही केवळ विजय-पराभवाची नसून विचारांची लढाई असते. मतदारांनी दिलेला पाठिंबा आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. आम्हाला मिळालेली ३१ मते ही सामाजिक परिवर्तनाच्या विचारांवर असलेला विश्वास दर्शवतात,” असे विश्वकर्मा म्हणाले. भविष्यातही वंचित बहुजन आघाडी जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष करत राहील आणि संघटन अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले असून विरोधी मतांच्या विभागणीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विश्वकर्मा यांच्या आरोपांवर काँग्रेस आणि एमआयएमकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी त्यांच्या वक्तव्यामुळे स्थानिक राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या आरोप-प्रत्यारोपांना अधिक महत्त्व प्राप्त होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी