
पुणे, 22 जून (हिं.स.)।
पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथे भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम) नागपूरचा जागतिक दर्जाचा शैक्षणिक व प्रशिक्षण कॅम्पस उभारला जाणार आहे. यासाठी मोशी (ता. हवेली) येथील २८ हेक्टर शासकीय जमीन महसूलमुक्त आणि भोगवटा मूल्यरहित स्वरूपात देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
राज्यात जागतिक दर्जाच्या शैक्षणिक सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात असून, यामुळे व्यवस्थापन शिक्षण, संशोधन, प्रशिक्षण तसेच उद्योग-संलग्न कौशल्य विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
या निर्णयानुसार मोशी येथील २८ हेक्टर जमीन आयआयएम नागपूरला शैक्षणिक व प्रशिक्षण कॅम्पस उभारण्यासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. या जमिनीचे प्रचलित बाजारमूल्यानुसार निश्चित करण्यात आलेले सुमारे १८६ कोटी रुपये इतके भोगवटामूल्य माफ करण्यात आले आहे. ही रक्कम राज्य शासनाचे भागभांडवल म्हणून संस्थेच्या अधिकृत भागभांडवलात समाविष्ट केली जाणार असून, त्यानंतर जमीन आयआयएमला महसूलमुक्त व भोगवटामूल्यरहित स्वरूपात प्रदान करण्यात येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु