पिंपरी चिंचवडमध्ये ‘झिरो वेस्ट स्लम’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे, 22 जून (हिं.स.) : पिंपरी चिंचवड शहरात कचरा व्यवस्थापन क्षेत्रात नागरिकांच्या सहभागामुळे सकारात्मक बदल दिसून येत असून, महापालिकेच्या ‘शून्य कचरा संकलन (झिरो वेस्ट स्लम)’ उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमांतर्गत गेल्या महिनाभरात तब्ब
पिंपरी चिंचवडमध्ये ‘झिरो वेस्ट स्लम’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद


पुणे, 22 जून (हिं.स.) : पिंपरी चिंचवड शहरात कचरा व्यवस्थापन क्षेत्रात नागरिकांच्या सहभागामुळे सकारात्मक बदल दिसून येत असून, महापालिकेच्या ‘शून्य कचरा संकलन (झिरो वेस्ट स्लम)’ उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

या उपक्रमांतर्गत गेल्या महिनाभरात तब्बल 11.47 टन कचऱ्याचे स्रोतस्तरावर विलगीकरण करण्यात आले आहे. यात 19,805 घरांनी सक्रिय सहभाग नोंदवला असल्याची माहिती महापालिकेच्या आकडेवारीतून समोर आली आहे.

संकलित कचऱ्यात 9.97 टन ओला कचरा, 1.50 टन सुका कचरा तसेच 643 किलो सॅनिटरी कचऱ्याचा समावेश असून, हा कचरा स्वतंत्रपणे व्यवस्थापित करण्यात आला आहे. या प्रक्रियेमुळे पुनर्वापर आणि पुनर्निर्मितीला चालना मिळत असून, पर्यावरणावर होणारा नकारात्मक परिणाम कमी होत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

महापालिकेकडून कचरा डेपोवरील ताण कमी करण्यासाठी आणि पर्यावरणपूरक व्यवस्थापनासाठी ‘झिरो वेस्ट’ संकल्पना राबविण्यात येत आहे. नागरिकांकडून ओला, सुका, सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचऱ्याचे विभाजन करण्याची सवय वाढत असल्याचे दिसून येत आहे.

महापौर रवि लांडगे यांनी सांगितले की, या उपक्रमाला मिळणारा प्रतिसाद हा नागरिकांच्या पर्यावरणाप्रती असलेल्या बांधिलकीचे प्रतीक आहे. तर महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नागरिकांना सातत्याने कचरा विलगीकरणाची सवय ठेवण्याचे आवाहन केले आहे.

‘माझा कचरा, माझी जबाबदारी’ ही संकल्पना अधिक बळकट होत असून, शहर स्वच्छ, सुंदर आणि शाश्वत करण्याच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande