
पुणे, 22 जून (हिं.स.)।
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) क्षेत्रातील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी आणि रेल्वे फाटके हटवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या अंतर्गत रेल्वे उड्डाणपूल (आरओबी) आणि रेल्वे मार्गाखालील भुयारी मार्ग (आरयूबी) यांच्या जलद व दर्जेदार बांधकामासाठी ‘पीएमआरडीए’ने महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (महारेल) यांच्यासोबत सामंजस्य करार केला आहे. या करारामुळे पुणे महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडीवर तोडगा निघण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मुख्यमंत्री तथा ‘पीएमआरडीए’चे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी पुणे परिसरातील वाहतूक समस्येची दखल घेत रेल्वे फाटकमुक्तीवर विशेष भर दिला होता. यापूर्वी झालेल्या बैठकीत रेल्वे मार्गावरील उड्डाणपूल, पादचारी पूल (एफओबी) आणि भुयारी मार्गांची कामे वेगवेगळ्या यंत्रणांऐवजी तांत्रिकदृष्ट्या सक्षम असलेल्या ‘महारेल’मार्फतच करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार या प्रक्रियेला गती देण्यात आली.
या निर्णयानंतर ‘पीएमआरडीए’ आणि ‘महारेल’ यांच्यात विविध स्तरांवर बैठका पार पडल्या. त्यानंतर सामंजस्य कराराचा मसुदा अंतिम करून दोन्ही संस्थांनी त्यावर स्वाक्षऱ्या केल्या. या करारावर ‘महारेल’चे व्यवस्थापकीय संचालक राजेशकुमार जयस्वाल आणि ‘पीएमआरडीए’चे महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी स्वाक्षरी केली. यावेळी ‘पीएमआरडीए’चे मुख्य अभियंता (प्रभारी) शिवप्रसाद बागडी यांच्यासह दोन्ही संस्थांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु