
अमरावती, 22 जून (हिं.स.)।
इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीची अंजनगावसुर्जी पोलिसांनी अवघ्या एका दिवसात सुखरूप सुटका केली. शहरातील ११ वीत शिकणारी विद्यार्थिनी १४ जून रोजी बेपत्ता झाली होती. याप्रकरणी तिच्या आईने १५ जून रोजी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तपासादरम्यान मुलीची इन्स्टाग्रामवरून बुलडाणा जिल्ह्यातील १९ वर्षीय तरुणाशी ओळख झाल्याचे निष्पन्न झाले. ठाणेदार सूरज बोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अनिल चांदोरे, सागर दुतोंडे व राधिका गाताडे यांच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे श्रीधरनगर (जि. बुलडाणा) येथून १७ जून रोजी मुलीची सुटका केली. संशयित अक्षय पंजाब चव्हाण (वय १९) याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीची वैद्यकीय तपासणी व समुपदेशन करून तिला आईच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास पोलिस करीत आहेत. सोशल मीडियावरील अनोळखी व्यक्तींशी संपर्क ठेवताना पालक व विद्यार्थ्यांनी सावध राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी