पोलिसांचे ‘ऑपरेशन ड्रॉप केस’; २०० पोलिसांच्या धाडीत कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त
जळगाव, 22 जून (हिं.स.) मुक्ताईनगर तालुक्यातील हलखेडा, लालगोटा, मधापुरी, जोधनखेडा आणि चारठाणा या गावांमध्ये वाढत्या फसवणूक, दरोडा आणि इतर गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली. ‘ऑपरेशन ड्रॉप केस’ अंतर्गत शुक्रवारी पह
पोलिसांचे ‘ऑपरेशन ड्रॉप केस’; २०० पोलिसांच्या धाडीत कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त


जळगाव, 22 जून (हिं.स.) मुक्ताईनगर तालुक्यातील हलखेडा, लालगोटा, मधापुरी, जोधनखेडा आणि चारठाणा या गावांमध्ये वाढत्या फसवणूक, दरोडा आणि इतर गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली. ‘ऑपरेशन ड्रॉप केस’ अंतर्गत शुक्रवारी पहाटे सुमारे २०० पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहभागातून व्यापक कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. या कारवाईत दोन सराईत आरोपींना अटक करण्यात आली असून मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने, शस्त्रे, वाहने आणि इतर संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आले आहे.

पोलिसांच्या तपासात असे समोर आले की, या भागातील काही व्यक्ती सोशल मीडियाच्या माध्यमातून काळी हळद, नागमणी, रेड मर्क्युरी, जुने सोने, सेकंड करन्सी आणि डबल इंजिन यांसारख्या कथित दुर्मिळ वस्तूंचे व्हिडिओ प्रसारित करून देशभरातील नागरिकांना मोठ्या नफ्याचे आमिष दाखवत होते. या आमिषाला बळी पडून गावात आलेल्या व्यक्तींची फसवणूक, लूटमार अथवा जबरी चोरी केल्याच्या तक्रारी विविध ठिकाणी नोंद झाल्या होत्या. पोलिसांच्या नोंदीनुसार, या परिसरात मागील तीन वर्षांत दरोड्याचे १०, खुनासह दरोड्याचा १, खुनाचा १, जबरी चोरीचे ७, फसवणुकीचे १६, दरोड्याचा प्रयत्न १ तसेच सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ल्याचे २ गुन्हे दाखल झाले आहेत. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ही विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान गुन्हा क्रमांक ३२२/२०२१ मधील फरार आरोपी विलास नरविलाल पवार (रा. हलखेडा) आणि गुन्हा क्रमांक २५७/२०२६ मधील आरोपी अजय दादा पवार (रा. हलखेडा) यांना अटक करण्यात आली. कारवाईत सुमारे २० लाख रुपये रोख रक्कम, अंदाजे ३० लाख रुपये किमतीचे ३०० ग्रॅम सोन्याचे दागिने, सुमारे ८ लाख रुपये किमतीचे ४ किलो चांदीचे दागिने, दोन गावठी कट्टे, तीन जिवंत काडतुसे, वन्यप्राण्यांची कातडी, चार चारचाकी वाहने, सहा दुचाकी वाहने आणि ३० मोबाईल फोन जप्त करण्यात आले. तसेच शस्त्र अधिनियम, महाराष्ट्र पोलीस अधिनियम, भारतीय न्याय संहिता आणि वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काही संशयितांकडून पिस्तूल, रिव्हॉल्वर आणि जिवंत काडतुसेही जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande