
पुणे, 22 जून (हिं.स.)। भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या (अमेच्युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया – एकेएफआय) अध्यक्षपदी युवा उद्योजक पुनीत बालन यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
या नव्या कार्यकारिणीत देशभरातील विविध राज्यांतील प्रतिनिधींना स्थान देण्यात आले असून एकूण २२ पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली आहे. २०२६ ते २०३० या कालावधीसाठीची महासंघाची निवडणूक झारखंडमधील रांची येथे पार पडली. या निवडणुकीसाठी देशातील २२ राज्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्राचे क्रीडा प्रशासक तथा उद्योजक पुनीत बालन यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
तसेच विदर्भातील माजी खासदार रामदास तडास यांची अध्यक्ष (प्रेसिडेंट एमेरिटस) म्हणून, तर बिहारचे राजकुमार सिंह यांची मुख्य संरक्षक (चीफ पॅट्रन) म्हणून निवड करण्यात आली आहे. सरचिटणीसपदी तेलंगणाच्या उशी रेड्डी यांची निवड करण्यात आली असून इतर महत्त्वाच्या पदांवरही विविध राज्यांतील प्रतिनिधींना संधी देण्यात आली आहे. ही निवडणूक उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रत्नाकर भेंगरा यांच्या देखरेखीखाली पार पडली. दिवाणी न्यायालयाचे सहायक निवडणूक अधिकारी तथा निवृत्त जिल्हा न्यायाधीश पंकज श्रीवास्तव यांनीही निवडणूक प्रक्रियेत भूमिका बजावली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु