राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढीला कोकण विभाग कार्यक्षेत्रास मंजुरी
रत्नागिरी, 22 जून (हिं.स.) । राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढीला कोकण विभाग कार्यक्षेत्रास सहकार विभागाकडून मंजुरी मिळाली आहे. सहकार आयुक्त व निबंधक दीपक तावरे यांच्या हस्ते मंजुरीपत्र संस्थेचे चेअरमन प्रकाश मांडवकर यांनी स्वीकारले. यावेळी संचालक
राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढीला कोकण विभाग कार्यक्षेत्रास मंजुरी


रत्नागिरी, 22 जून (हिं.स.) । राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढीला कोकण विभाग कार्यक्षेत्रास सहकार विभागाकडून मंजुरी मिळाली आहे. सहकार आयुक्त व निबंधक दीपक तावरे यांच्या हस्ते मंजुरीपत्र संस्थेचे चेअरमन प्रकाश मांडवकर यांनी स्वीकारले.

यावेळी संचालक रमेश सूद, अनंत मोरवसकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पाटकर तसेच शाखाधिकारी प्रकाश भाबळे उपस्थित होते.

पतसंस्थेला सन २०१८ मध्ये भू, कोंड्ये, नाटे, सागवे आणि आडीवरे या पाच नवीन शाखांना मंजुरी मिळाली. त्यानंतर २०२० मध्ये संस्थेच्या कार्यक्षेत्राचा विस्तार संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात करण्यात आला. सन २०२२ मध्ये पाली, सापूचे तळे, भांबेड आणि साखरपा या चार नवीन शाखांना मंजुरी मिळाली. आता २०२६ मध्ये कोकण विभाग कार्यक्षेत्रास मंजुरी मिळाल्याने संस्थेच्या विकासाला नवी दिशा प्राप्त झाली आहे.

आर्थिक शिस्त, उत्कृष्ट व्यवस्थापन आणि सभासदाभिमुख धोरणांच्या बळावर संस्थेने सातत्याने ९९ टक्के कर्जवसुली, शून्य टक्के नेट एनपीए आणि आदर्श सीडी रेशो कायम राखला आहे. त्यामुळे सभासद, ठेवीदार आणि ग्राहकांचा संस्थेवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.

कोकण विभाग कार्यक्षेत्र मंजुरीमुळे आता रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये संस्थेच्या सेवा अधिक प्रभावीपणे पोहोचणार असून सहकार क्षेत्रातील संस्थेचे स्थान आणखी बळकट होणार आहे. या ऐतिहासिक यशाबद्दल सभासद, ठेवीदार, ग्राहक, अधिकारी, कर्मचारी, पिग्मी व आरडी प्रतिनिधी यांच्याकडून आनंद व्यक्त करण्यात येत असून सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

संस्थेचे चेअरमन प्रकाश मांडवकर, व्हाइस चेअरमन प्रकाश लोळगे, संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पाटकर, अधिकारी, कर्मचारी तसेच पिग्मी व आरडी प्रतिनिधी यांचे अभिनंदन होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande