
अलिबाग, 22 जून (हिं.स.) :अलिबाग तालुक्यातील किहीम ग्रामपंचायत हद्दीतील शिवकालीन ऐतिहासिक श्रीभिल्लेश्वर तलावाच्या सर्वांगीण विकासाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. सुमारे सात एकर क्षेत्रफळ असलेल्या या तलावातील गेल्या चार दशकांपासून साचलेला गाळ काढण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. या कामानंतर तलावाचे सुशोभीकरण आणि विविध विकासकामे हाती घेतली जाणार आहेत.
किहीम ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून पोकलेन आणि जेसीबीच्या साहाय्याने गेल्या महिनाभरापासून गाळ उपसणीचे काम सुरू आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला बंगळुरूचे प्रसिद्ध जलसंवर्धन तज्ज्ञ ‘लेकमॅन’ आनंद मल्लीगवाड यांचे मार्गदर्शन लाभत आहे. यापूर्वी त्यांनी वेश्वी येथील गोकुळेश्वर तलावाच्या यशस्वी विकासातही महत्त्वाची भूमिका बजावली होती.
सरपंच प्रसाद (पिंट्या) गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पासाठी सुमारे १ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. आरसीएफ कंपनीकडून सामाजिक दायित्व निधीतून (CSR) आर्थिक मदत जाहीर करण्यात आली असून, इतर देणगीदार व संस्थांकडूनही निधी उभारणीचे प्रयत्न सुरू आहेत.
या विकास प्रकल्पांतर्गत तलाव परिसरात वॉकिंग ट्रॅक, खुली व्यायामशाळा, मुलांसाठी खेळाची साधने, ज्येष्ठ नागरिकांसाठी आसनव्यवस्था तसेच बोटिंग सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच परिसरात विविध प्रजातींची झाडे लावली जाणार असून पक्षी व बदकांसाठी मध्यभागी विशेष बेट तयार करण्यात येणार आहे.
उपसरपंच मिलिंद पडवळ यांनी सांगितले की, या प्रकल्पामुळे श्रीभिल्लेश्वर मंदिर परिसराचे सौंदर्य वाढेल आणि पर्यटनाला मोठी चालना मिळेल. यामुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील आणि गावाच्या आर्थिक विकासालाही गती मिळेल.
शिवकालीन वारसा, जलसंवर्धन आणि पर्यटन विकास यांचा संगम साधणारा हा प्रकल्प किहीमच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
---------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)