
कोल्हापूर, 22 जून (हिं.स.)। वीज ग्राहकांना स्मार्ट मीटरबाबत अचूक व पारदर्शक माहिती मिळावी तसेच ग्राहकांच्या मनातील शंका दूर व्हाव्यात यासाठी महावितरणतर्फे जिल्हाभर व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत उपविभागापर्यंत मेळावे, गावोगावी बैठका, तसेच विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून स्मार्ट मीटरचे फायदे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत. स्मार्ट मीटर जनजागृती मेळावे आज मंगळवार (दि.23) पासून सुरु करण्यात येणार असून प्रत्येक मंगळवारी हे मेळावे उपविभागीय कार्यालयांपर्यंत घेतले जाणार आहेत, असे कोल्हापूर मंडलाचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे यांनी सांगितले आहे.
स्मार्ट मीटरमुळे वीज वापराची माहिती ग्राहकांना तात्काळ उपलब्ध होणार असून बिलिंग प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येणार आहे. तसेच कर्मचाऱ्यास मीटर रीडिंगसाठी प्रत्यक्ष जागेवर येण्याची गरज भासत नाही. ग्राहकांना त्यांच्या वीज वापरावर नियंत्रण ठेवणे सुलभ होणार असून ऊर्जा बचतीलाही चालना मिळणार आहे. स्मार्ट मीटरबाबत विविध स्तरावर गैरसमज असल्याने नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीच स्वीकारावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.
महावितरण प्रत्येक मंगळवारी सकाळी 10.00 ते दुपारी 1.30 पर्यंत उपविभागीय कार्यालय स्तरापर्यंतचे मेळावे घेणार आहे. तसेच मंगळवार शासकीय सुट्टी असेल तर पुढील दिवशी म्हणजेच बुधवारी सदरचा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व उपविभागीय कार्यालये, ग्राहक सेवा केंद्रे तसेच ग्रामपंचायत स्तरावर जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
महावितरणचे अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या सहभागातून ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येणार असून ग्राहकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी विशेष यंत्रणाही कार्यरत राहणार आहे. स्मार्ट मीटर हे आधुनिक वीज व्यवस्थापनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, जिल्ह्यातील ग्राहकांनी जनजागृती कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन स्मार्ट मीटरविषयी संपूर्ण माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन कोल्हापूर मंडलाचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar