
सोलापूर, 22 जून (हिं.स.)।
सोलापूर विधानपरिषद निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर भाजप महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. “इतका अहंकार बरा नाही,” असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे मोहिते पाटील गटावर निशाणा साधला.
विजयानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी, “विधानसभा निवडणुकीतील पराभव हा अपघात होता. मात्र, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी पुन्हा एकदा आमदारकीची संधी दिली,” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनीवरून राजेंद्र राऊत यांच्याशी संवाद साधून त्यांचे अभिनंदन केले. विधानपरिषद निवडणुकीतील विजयाबद्दल शुभेच्छा देताना त्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या. यावेळी राऊत यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.
दुसरीकडे, माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांनीही प्रतिक्रिया देताना, “माळशिरसमध्ये आतापर्यंत मोहिते पाटलांच्या विरोधात रामभाऊ एकटे लढत होते, आता रामभाऊ आणि राजाभाऊ दोघे मिळून लढतील,” असे म्हटले.
निकालानंतर मतमोजणी केंद्राबाहेर भाजप समर्थकांनी मोठा जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण आणि घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी विजय साजरा केला.
दरम्यान, काही कार्यकर्त्यांनी विरोधकांवर टीका करणारे बॅनर आणि सोशल मीडियावरील व्यंगचित्रांचा वापर केल्याचेही दिसून आले. तथापि, अशा प्रकारच्या वैयक्तिक टीका, उपहासात्मक चित्रे किंवा आक्षेपार्ह मजकूर हा संबंधित कार्यकर्त्यांचा भाग असून त्याला अधिकृत राजकीय भूमिका समजू नये, अशी सावध भूमिका जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड