सोलापूर विधानपरिषदेत राजेंद्र राऊत यांचा विजय; भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष
सोलापूर, 22 जून (हिं.स.) : सोलापूर विधानपरिषद निवडणुकीत भाजप महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी 365 मतांनी विजय मिळवत दमदार यश संपादन केले. निकाल जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. ही निवडणूक पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासाठी
Jaykumar gore newss


सोलापूर, 22 जून (हिं.स.) : सोलापूर विधानपरिषद निवडणुकीत भाजप महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी 365 मतांनी विजय मिळवत दमदार यश संपादन केले. निकाल जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. ही निवडणूक पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जात असल्याने निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते.

सोलापूर विधानपरिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपकडून प्रयत्न करण्यात आले होते. मात्र, धैर्यशील मोहिते-पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे निवडणूक अटळ ठरली. महाविकास आघाडीकडून वसंत देशमुख हे उमेदवार रिंगणात उतरल्याने ही लढत राजकीयदृष्ट्या अत्यंत चुरशीची ठरली. जिल्ह्यात या निवडणुकीकडे जयकुमार गोरे विरुद्ध मोहिते-पाटील असा सामना म्हणूनही पाहिले जात होते.

विजयानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जयकुमार गोरे यांनी विरोधकांवर अप्रत्यक्ष टीका केली. काही लोकांना अहंकार असतो आणि जनतेला गृहीत धरण्याची सवय असते. अदृश्य शक्तीचे अनेक प्रयोग झाले, मात्र अशा शक्ती आता जिल्ह्यातून अदृश्य झाल्या असल्याचे ते म्हणाले.

राजेंद्र राऊत यांच्या विजयाचे कौतुक करताना गोरे यांनी त्यांची तुलना इतिहासातील पराक्रमी योद्धा बाजीप्रभू देशपांडे यांच्याशी केली. राजेंद्र राऊत हे आमचे बाजीप्रभू आहेत. वेळ पडल्यास खिंड लढवणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय देता आला, याचा आनंद आहे, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, माळशिरस विधानसभा मतदारसंघातील नेतृत्वाबाबत सुरू असलेल्या चर्चांनाही त्यांनी उत्तर दिले. विधानपरिषद निवडणुकीत पाठिंबा देणारे उत्तम जानकर यांचे सहकार्य मान्य करतानाच, माळशिरसमध्ये राम सातपुते हेच आमचे नेते आहेत असे स्पष्ट केले.

यावेळी अकलूजच्या राजकारणावरही त्यांनी अप्रत्यक्ष भाष्य केले. “सोलापूर जिल्ह्याने सरंजामशाही चालणार नसल्याचे दाखवून दिले आहे. केवळ प्रतिमेवर आधारित राजकारण नव्हे, तर जनतेच्या संपर्कातील आणि जमिनीवरील राजकारणालाच महत्त्व आहे,” असे ते म्हणाले.

अधिक मतांची अपेक्षा असली तरी मिळालेला विजय महत्त्वाचा असल्याचे सांगत जयकुमार गोरे यांनी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांचे आभार मानले.

---------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande