फिफा विश्वचषक २०२६: स्पेनचा सौदी अरेबियावर ४-० ने दणदणीत विजय
अटलांटा (अमेरिका), 22 जून (हिं.स.) फिफा विश्वचषक २०२६ च्या ''गट एच'' मधील सामन्यात, युवा स्टार लॅमिन यमाल आणि फॉरवर्ड मिकेल ओयारझाबल यांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर स्पेनने सौदी अरेबियाचा ४-० असा पराभव केला. केप वर्दे विरुद्धचा पहिला सामना गो
लामिन यामाल


अटलांटा (अमेरिका), 22 जून (हिं.स.) फिफा विश्वचषक २०२६ च्या 'गट एच' मधील सामन्यात, युवा स्टार लॅमिन यमाल आणि फॉरवर्ड मिकेल ओयारझाबल यांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर स्पेनने सौदी अरेबियाचा ४-० असा पराभव केला. केप वर्दे विरुद्धचा पहिला सामना गोलशून्य बरोबरीत सुटल्यानंतर, स्पेनने या सामन्यात वर्चस्व गाजवणारा खेळ करत स्पर्धेतील आपली ताकद सिद्ध केली.

यमालने सामन्यातील पहिला गोल केला, त्यानंतर ओयारझाबलने दोन गोल नोंदवले, तर सौदी अरेबियाच्या फुटबॉसपटूने केलेल्या 'ओन गोल'मुळे त्यांची स्थिती अधिकच बिकट झाली. सामन्याच्या सुरुवातीपासूनच स्पेनने खेळावर नियंत्रण मिळवले आणि १० व्या मिनिटाला यमालने संघाला आघाडी मिळवून दिली. ओयारझाबलने दिलेल्या पासवर १८ वर्षीय फॉरवर्ड यमालने अगदी जवळून शांतपणे गोल करत संघाला सुरुवातीची आघाडी मिळवून दिली. हा गोल यमालसाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला. १८ वर्षे आणि ३४३ दिवस वय असताना गोल करणारा यमाल फिफा विश्वचषकाच्या इतिहासातील आठवा सर्वात तरुण गोल करणारा फुटबॉलपटू ठरला.

स्पेनने चेंडूवरील ताबा आणि संधी निर्माण करण्याचे काम सुरूच ठेवले आणि सौदी अरेबियाला त्यांच्याच हाफमध्ये रोखून धरले. त्यांच्या सातत्यपूर्ण दबावाचा फायदा २१ व्या मिनिटाला झाला, जेव्हा ओयारझाबलने संघाची आघाडी दुप्पट केली. पेनल्टी एरियामध्ये चपळाई दाखवत या स्ट्रायकरने जवळून गोल केला आणि आघाडी २-० अशी केली.

त्यानंतर अवघ्या तीन मिनिटांनी, ओयारझाबलने पुन्हा गोल करत स्पेनची आघाडी वाढवली. बॉक्समध्ये डॅनी ओल्मोने दिलेल्या चाणाक्ष पासमुळे ही संधी निर्माण झाली आणि स्ट्रायकरने अचूक फिनिशिंग करत गोल नोंदवला. पहिल्या हाफमध्ये सौदी अरेबियाला स्पेनच्या आक्रमणाला रोखण्यासाठी संघर्ष करावा लागला. त्याच वेळी, ओयारझाबलने हाफ संपण्यापूर्वी हॅट्ट्रिक पूर्ण करण्याच्या जवळही आला होता. पण त्याचा फटका क्रॉसबारला लागला. दुसऱ्या हाफच्या चौथ्या मिनिटाला स्पेनने सामन्यावरील आपली पकड अधिक मजबूत केली. मार्क कुकुरेलाने बॉक्समध्ये मारलेला धोकादायक फटका सौदीचा डिफेंडर हसन अल्ताम्बक्ती याला लागून दिशा बदलली आणि चेंडू थेट जाळीत गेला, ज्यामुळे 'ओन गोल' झाला.

चार गोलची आघाडी मिळाल्यानंतर, स्पेनने उर्वरित सामना सहजपणे नियंत्रित केला आणि महत्त्वाच्या फुटबॉलपटूंना विश्रांती देण्यासाठी अनेक बदल केले. सौदी अरेबियाकडून फारसे आव्हान निर्माण झाले नाही आणि गोलरक्षक उनाई सायमनला फारसे काम करावे लागले नाही. स्पेनच्या फेरान टोरेसने 'स्टॉपेज टाइम'मध्ये संघासाठी पाचवा गोल केल्याचे वाटले होते, पण 'व्हीएआर'ने तो 'ऑफसाइड' ठरवून रद्द केला. तरीही, स्पेनने ४-० असा दणदणीत विजय मिळवत आपली विश्वचषक मोहीम पुन्हा एकदा रुळावर आणली. या विजयामुळे स्पेनने दोन सामन्यांतून चार गुण मिळवत 'गट एच'च्या गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande