
लातूर, २२ जून (हिं.स.) : उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर तालुक्यातील शाळा सुरू झाल्या असल्या तरी विद्यार्थ्यांना तीव्र ऊन, प्रचंड उकाडा आणि पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. जून महिना अर्धा उलटून गेला तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने वातावरणातील उष्णता कायम असून विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.
विद्यार्थ्यांना शाळेत जाताना आणि दुपारच्या वेळी घरी परतताना कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी पायी किंवा सायकलवरून शाळेत ये-जा करतात, त्यामुळे उष्णतेचा त्यांच्यावर अधिक परिणाम होत आहे. दुपारच्या वेळेत वाढणाऱ्या उकाड्यामुळे वर्गात बसून अभ्यास करतानाही विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
तालुक्यातील काही गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या गंभीर बनली आहे. त्यामुळे शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्यासाठी प्रशासन आणि शाळा व्यवस्थापनाला अतिरिक्त प्रयत्न करावे लागत आहेत. काही ठिकाणी विद्यार्थ्यांना घरून पाण्याच्या बाटल्या घेऊन याव्या लागत आहेत.
शिक्षण विभागाने उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन मार्च आणि एप्रिल महिन्यात शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र १५ जूनपासून शाळा पुन्हा सुरू झाल्यानंतर यंदा त्या दोन सत्रांमध्ये भरवल्या जात आहेत. तरीही उन्हाची तीव्रता कायम असल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.
अनेक शाळांमधील हातपंपांचे पाणी कमी झाले असून गावोगावी पाणीटंचाई अधिक तीव्र झाली आहे. यामुळे पुढील दिवसांत शाळांमध्ये विद्यार्थ्यांना उष्णतेचा आणि पाणीटंचाईचा त्रास होऊ नये यासाठी ठोस नियोजन करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
डॉक्टरांनी उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी भरपूर पाणी पिणे, डोक्यावर टोपी किंवा रुमाल वापरणे तसेच उन्हात अनावश्यक फिरणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. शिक्षकांकडूनही विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले जात असून गरज भासल्यास विश्रांती देण्यात येत आहे.
दरम्यान, लवकरच चांगला पाऊस पडून वातावरणात गारवा निर्माण व्हावा आणि उकाड्यापासून दिलासा मिळावा, अशी अपेक्षा विद्यार्थी, पालक आणि शिक्षक व्यक्त करीत आहेत.
------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis