
छत्रपती संभाजीनगर, 22 जून (हिं.स.) : औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुहास शिरसाट यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. मतमोजणीत शिरसाट यांना तब्बल ४५४ मते मिळाली, तर ठाकरे सेनेचे उमेदवार गणेश लोखंडे यांना १३४ मतांवर समाधान मानावे लागले.
या निवडणुकीत भाजप, ठाकरे सेना आणि अपक्ष उमेदवार यांच्यात तिरंगी लढत रंगली होती. मात्र मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच सुहास शिरसाट यांनी स्पष्ट आघाडी घेतली आणि ती अखेरपर्यंत कायम राखत एकतर्फी विजय मिळवला.
या विजयामुळे औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून, पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. निकाल जाहीर होताच समर्थकांनी जल्लोष करत शिरसाट यांचे अभिनंदन केले.
राजकीय विश्लेषकांच्या मते, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधींचा भाजपवरील वाढता विश्वास या निकालातून स्पष्टपणे दिसून आला आहे. या विजयामुळे आगामी स्थानिक आणि प्रादेशिक राजकारणावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis