
लातूर, 22 जून (हिं.स.)।
लातूर जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांनी प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा यांचे उत्कृष्ट उदाहरण सादर करत सुमारे ३ लाख ५० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने असलेली बेवारस अवस्थेत सापडलेली बॅग तिच्या मूळ मालकाचा शोध घेऊन त्यांच्या ताब्यात सुपूर्द केली आहे.
दिनांक ११ मे २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे हे स्टाफसह जिल्हा रात्रगस्तीवर असताना पोलीस ठाणे मुरुड हद्दीत मध्यरात्रीच्या सुमारास त्यांना रस्त्याच्या मध्यभागी एक बॅग पडलेली दिसून आली. संशय आल्याने त्यांनी वाहन थांबवून सदर बॅगेची पाहणी केली असता त्यामध्ये लहान मुलांचे कपडे, पुरुषांचे कपडे तसेच एका बॉक्समध्ये सोन्याचा नेकलेस व झुमके असल्याचे आढळून आले.
घटनास्थळी व परिसरात तात्काळ चौकशी करण्यात आली. मात्र त्यावेळी बॅगेचा मालक अथवा संबंधित व्यक्ती आढळून आली नाही. प्रथमदर्शनी सदरची बॅग एखाद्या प्रवाशाच्या वाहनातून पडल्याचे लक्षात आल्याने ती सुरक्षितरित्या पोलीस ठाणे मुरुड येथे जमा करण्यात आली.
त्यानंतर पोलीस अधीक्षक अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष प्रयत्न सुरू करण्यात आले. बॅगेतील कपड्यांचे वर्णन, सोन्याच्या दागिन्यांच्या बॉक्सवरील माहिती तसेच विविध माध्यमांतून चौकशी करून मूळ मालकाचा शोध घेण्याचे काम सातत्याने सुरू ठेवण्यात आले.
अखेर तपासादरम्यान सदर बॅग ही संदीप मंगलदास सुरनर (वय ३३ वर्षे राहणार रुदा तालुका अहमदपूर जिल्हा लातूर) यांची असल्याचे व त्यामधील सोन्याचे दागिने हे त्याच्या पत्नीचे असल्याचे निष्पन्न झाले. चौकशीअंती संदीप सुरनर हे दिनांक ११ मे २०२६ रोजी आपल्या कुटुंबासह ऑटो रिक्षाने रुद्रा येथून पुण्याकडे जात असताना मुरुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांची बॅग वाहनातून पडून हरवल्याचे समोर आले.
सदर बॅगेतील कपड्यांचे तसेच सोन्याच्या दागिन्याची ओळख, मालकी हक्काची पडताळणी व आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आज पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या हस्ते मौल्यवान दागिने मूळ मालकास परत करण्यात आले.
या बॅगेमध्ये सुमारे २३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे नेकलेस व झुमके असून त्यांची किंमत अंदाजे ३ लाख ५० हजार रुपये आहे. इतक्या मोठ्या किमतीचे दागिने सुरक्षितपणे परत मिळाल्याने संदीप सुरनर यांच्या व त्यांच्या पत्नीच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले. त्यांनी लातूर जिल्हा पोलीस दलाचे मनःपूर्वक आभार मानत पोलीसांच्या प्रामाणिकपणा व कर्तव्यदक्षतेचे विशेष कौतुक केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis