
अमरावती, 22 जून (हिं.स.) : कापूसतळणी ते निंभारी व खिरगव्हाण मार्गांच्या जोडावर असलेले जुनाट बाभळीचे झाड अपघाताला आमंत्रण देत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. झाडाचे खोड जमिनीपासून सडलेले असून ते रस्त्याकडे झुकले असल्याने कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कापूसतळणी-निंभारी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्त्यालगत हे झाड उभे आहे. या मार्गावरून कापूसतळणी, सोनगाव, सैदापूर, निंभारी तसेच खिरगव्हाण येथील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा सुरू असते. तसेच परिसरातील अनेक शेतकऱ्यांची शेती या मार्गांलगत असल्याने कृषी कामांसाठीही या रस्त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून वादळी वारे व मुसळधार पावसामुळे हे सडलेले झाड अचानक कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे वाहनचालक, शेतकरी आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
संभाव्य अपघात टाळण्यासाठी संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून धोकादायक झाड हटवावे किंवा आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. नागरिकांच्या या मागणीकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
-----------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी