गडचिरोली: अहेरी नगरपंचायत कर अधिकारी हल्ला प्रकरण, तीन फरार आरोपी अखेर पोलिसांना शरण
गडचिरोली, 22 जून (हिं.स.)अहेरी नगरपंचायतीचे कर अधिकारी वैभव पांढरे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणाला आता मोठी कलाटणी मिळाली असून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि माजी जिल्हा परिषद
गडचिरोली: अहेरी नगरपंचायत कर अधिकारी हल्ला प्रकरण, तीन फरार आरोपी अखेर पोलिसांना शरण


गडचिरोली, 22 जून (हिं.स.)अहेरी नगरपंचायतीचे कर अधिकारी वैभव पांढरे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणाला आता मोठी कलाटणी मिळाली असून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांना १३ जून रोजी चामोर्शी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांची रवानगी MCR (न्यायालयीन कोठडीत) केली आहे.दुसऱ्या बाजूला, घटनेनंतर सातत्याने फरार असलेल्या अन्य तीन मुख्य आरोपींनी अखेर पोलिसांच्या वाढत्या दबावापुढे लोटांगण घालत पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे.

हे आहेत शरण आलेले मुख्य आरोपी:

१. अजय दादाराव नैताम

२. श्रीनिवास उर्फ पिंटू लक्ष्मण मडावी

३. इमरान मुस्तफा पठाण

काय आहे नेमकं प्रकरण?

अहेरी नगरपंचायतीचे कर अधिकारी वैभव पांढरे यांच्यावर 10 जून रोजी जीवघेणा हल्ला झाला होता. या घटनेने संपूर्ण अहेरीसह जिल्हा शासकीय वर्तुळात तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण पसरले होते. या गंभीर गुन्ह्याची नोंद होताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. मुख्य संशयित अजय कंकडालवार यांच्या अटकेनंतर पोलिसांनी फरार आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी छापेमारी सुरू केली होती. अखेर अटकेची भीती आणि पोलिसांचा वाढता दबाव सहन न झाल्याने या तीनही मुख्य आरोपींना पोलिसांसमोर आत्मसमर्पण करावे लागले.

आज न्यायालयात होणार हजर; पोलीस कोठडीची शक्यता??

शरण आलेल्या अजय नैताम, श्रीनिवास मडावी आणि इमरान पठाण या तिघांनाही पोलीस आज (सोमवार) चामोर्शी न्यायालयात हजर करणार आहेत.

तपासाचे मुख्य मुद्दे आणि पोलिसांची भूमिका:

अधिकारी वैभव पांढरे यांच्यावर झालेल्या या प्राणघाती हल्ल्याचा मुख्य सूत्रधार (मास्टरमाइंड) कोण आहे? सरकारी अधिकाऱ्यावर इतक्या टोकाचा हल्ला करण्यामागचा नेमका हेतू किंवा कट काय होता? आणि या संपूर्ण प्रकरणात आणखी कोणत्या बड्या नेत्यांचा अथवा व्यक्तींचा सहभाग आहे का? या सर्व बाबींचा सखोल तपास करण्यासाठी पोलीस आज न्यायालयात आरोपींची पोलीस कोठडी (PCR) मागण्याची दाट शक्यता आहे.

माजी जि.प. अध्यक्षांना मिळालेली न्यायालयीन कोठडी आणि मुख्य तीन आरोपींचे आत्मसमर्पण यामुळे या हाय-प्रोफाइल प्रकरणाकडे आणि आज चामोर्शी न्यायालय या तिघांबाबत काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याचे लक्ष वेधले गेले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Milind Khond


 rajesh pande