आदिवासी शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू, ६ जुलैला पहिली गुणवत्ता यादी; १ जुलैपासून स्वयंम अर्ज नूतनीकरणाची संधी
नाशिक, 22 जून (हिं.स.)। सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाचा श्रीगणेशा झाला असून, शाळा, विद्यालये व महाविद्यालये सुरु झाले आहेत. त्यापार्श्वभूमीवर आदिवासी विकास विभागाने राज्यातील शासकीय वसतिगृह प्रवेश आणि पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेच्या प्रवेश
आदिवासी शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू, ६ जुलैला पहिली गुणवत्ता यादी; १ जुलैपासून स्वयंम अर्ज नूतनीकरणाची संधी


नाशिक, 22 जून (हिं.स.)।

सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाचा श्रीगणेशा झाला असून, शाळा, विद्यालये व महाविद्यालये सुरु झाले आहेत. त्यापार्श्वभूमीवर आदिवासी विकास विभागाने राज्यातील शासकीय वसतिगृह प्रवेश आणि पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेच्या प्रवेश प्रक्रियेचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार कार्यवाही करण्याचे आदेश आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड यांनी सर्व अपर आयुक्त, प्रकल्प अधिकारी आणि गृहपाल यांना दिले आहेत. विविध अभ्यासक्रमांच्या स्तरांनुसार अर्ज करण्याची व गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. प्री-मॅट्रिक विद्यार्थ्यांसाठी नवीन प्रवेश अर्ज १६ जून २०२६ पासून सुरू झाले असून, त्यांची गुणवत्ता यादी ६ जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध होईल. याव्यतिरिक्त, ज्युनिअर कॉलेज, डिप्लोमा, पदवी, पदव्युत्तर आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी नवीन प्रवेश अर्ज १ जुलै २०२६ पासून सुरू होणार आहेत. या सर्व अभ्यासक्रमांची गुणवत्ता यादी २२ जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाईल. तर १ जुलैपासून स्वयंम योजनेच्या अर्जाचे नूतनीकरण करता येणार आहे.शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने होणार आहे. पात्र अर्जांची पडताळणी करण्याची संपूर्ण जबाबदारी गृहपालांवर सोपविण्यात आली असून, अपात्र अर्ज कोणत्याही परिस्थितीत मंजूर होणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचना आदिवासी विकास आयुक्त बनसोड यांनी दिल्या आहेत. दरम्यान, वसतिगृहाची मंजूर क्षमता १०० टक्के पूर्ण भरल्याचे प्रमाणपत्र संबधित गृहपालांकडून प्राप्त झाल्यानंतरच प्रकल्प अधिकाऱ्यांनी स्वयंम योजनेसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज वर्ग करावेत, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

विद्यार्थ्यांसाठी विषेश सूचनाज्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीत निवड होईल, त्यांनी ७ दिवसांच्या आत प्रवेश निश्चित करणे अनिवार्य आहे. अन्यथा त्यांचा प्रवेश रद्द करून प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्याचा विचार केला जाईल. तसेच, जुन्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालय सुरू झाल्यानंतर १५ दिवसांच्या आत वसतिगृह प्रवेश नूतनीकरण करणे आवश्यक असून, ३० दिवसांची मुदत उलटल्यानंतर प्रवेश रद्द समजला जाईल. अधिक माहितीसाठी वेळोवेळी https://mahatribal.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande