गाडगेबाबांच्या स्मृती जपत स्वच्छतेचा वसा
अमरावती, 22 जून (हिं.स.)। जगाला स्वच्छतेचा संदेश देणारे संत गाडगेबाबा यांच्या जन्मभूमी शेंडगाव येथे त्यांच्या विचारांचा वारसा जपत दोन ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने स्वच्छता मोहिमेला सुरवात केली आहे. परिसरात वाढलेली काटेरी झुडुपे आणि गवत हटवून गाडगे
गाडगेबाबांच्या स्मृती जपत स्वच्छतेचा वसा


अमरावती, 22 जून (हिं.स.)।

जगाला स्वच्छतेचा संदेश देणारे संत गाडगेबाबा यांच्या जन्मभूमी शेंडगाव येथे त्यांच्या विचारांचा वारसा जपत दोन ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने स्वच्छता मोहिमेला सुरवात केली आहे. परिसरात वाढलेली काटेरी झुडुपे आणि गवत हटवून गाडगेबाबांच्या स्वच्छतेच्या संदेशाला कृतीतून अभिवादन करण्याचे काम ते करीत आहेत. शेंडगाव विकास आराखड्यांतर्गत उभारण्यात आलेल्या विविध इमारतींच्या परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात काटेरी झुडुपे वाढली आहेत. सुमारे २२ एकर परिसर झुडुपांच्या विळख्यात अडकला असून परिसराचे विद्रूपीकरण होत आहे. या पार्श्वभूमीवर शेंडगाव येथील योगेश जानोरकर आणि प्रभाकर गावनेर यांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता स्वतःहून स्वच्छता मोहिमेची जबाबदारी स्वीकारली आहे. दोघेही दररोज परिसरातील काटेरी झुडुपे, गवत आणि कचरा हटविण्याचे काम करीत आहेत. गाडगेबाबांच्या स्वच्छता, श्रमदान आणि समाजसेवेच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन हा उपक्रम राबविला जात असल्याने गावकऱ्यांकडून त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे. ग्रामस्थांच्या मते, कोट्यवधी रुपयांचा निधी खर्चून उभारण्यात आलेल्या या वास्तूंचा समाजोपयोगी वापर होणे आवश्यक आहे. येथे मेडिकल कॉलेज, बहुविशेषज्ञ रुग्णालय किंवा मोठा उद्योग प्रकल्प सुरू झाल्यास परिसराचा विकास होऊन स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे शासनाने या वास्तूंच्या वापराबाबत ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande