तेलकट पदार्थांसाठी बटर पेपरच वापरा; एफडीएचा व्यापाऱ्यांना इशारा
रायगड, 22 जून (हिं.स.)। गरम व तेलकट खाद्यपदार्थांचे पॅकिंग करण्यासाठी वर्तमानपत्राच्या कागदाचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांवर अन्न व औषध प्रशासनाकडून (FDA) दंडात्मक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात अन्नसुरक्षेबाबत अधिक काटेकोर अंमलबजावणी सुरू
Use only butter paper for oily foods; FDA warns traders.


रायगड, 22 जून (हिं.स.)। गरम व तेलकट खाद्यपदार्थांचे पॅकिंग करण्यासाठी वर्तमानपत्राच्या कागदाचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांवर अन्न व औषध प्रशासनाकडून (FDA) दंडात्मक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात अन्नसुरक्षेबाबत अधिक काटेकोर अंमलबजावणी सुरू असून आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी तपास पथके कार्यरत करण्यात आली आहेत.

वडापाव, भजी, भेळ तसेच अन्य गरम व तेलकट पदार्थ पॅकिंगसाठी अनेक ठिकाणी वर्तमानपत्राचा वापर केला जातो. मात्र, अशा प्रकारे खाद्यपदार्थ देणे आरोग्यास घातक ठरू शकते, असे अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे. वर्तमानपत्र छपाईसाठी वापरण्यात येणाऱ्या शाईमध्ये शिसे (Lead), कॅडमियमसारखे विषारी धातू असतात. गरम अथवा तेलकट पदार्थ या कागदाच्या संपर्कात आल्यास त्यातील रसायने अन्नात मिसळण्याची शक्यता असते. त्यामुळे पोटाचे विकार, यकृताशी संबंधित आजार तसेच इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

या पार्श्वभूमीवर गरम आणि तेलकट खाद्यपदार्थ पॅकिंगसाठी वर्तमानपत्राचा वापर करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

दरम्यान, म्हसळा शहरातील अनेक हॉटेल, खाद्यगाड्या आणि टपरीधारकांनी प्रशासनाच्या आदेशाचे पालन करण्यास सुरुवात केली आहे. वर्तमानपत्राऐवजी बटर पेपरचा वापर करून खाद्यपदार्थ पॅक केले जात असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

प्रशासनाच्या या मोहिमेचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून, आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande